महामार्गाच्या कामामुळे लगतच्या गावांना पुराचा धोका; नाले काढण्याच्या सूचना : आपत्ती निवारण आराखडा तयार

२००५ साली झालेली दुर्घटना ही दरडी कोसळल्यामुळे झाली होती हे लक्षात घेता तालुक्यातील विविध भागांतून झालेले माती उत्खनन ही धोक्याची घंटा ठरू शकते.

  महाड: महामार्गाच्या कामासाठी टाकण्यात आलेल्या भरावामुळे महामार्गालगत असलेल्या गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. या ठिकाणी पाणी साचू नये यासाठी नाले काढण्याच्या सूचना महाड तहसील कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती होत असताना लगतच्या जमिनीमधून करण्यात आलेला भराव संभाव्य धोक्यांचा मोठा भाग असू शकतो अशी शक्यता वर्तविली जात आहे.

  राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मिती करता तालुक्यातील जवळपास २० ते २५ पेक्षा जास्त ग्रामपंचायतीच्या हद्दीमधून मोठ्या प्रमाणात माती उत्खनन करण्यात आले आहे. मात्र हे करताना यामुळे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी कोणता धोका स्थानिक नागरिकांना तसेच त्यांच्या शेतीला भात उत्पादनाला होईल याकडे संबधित ग्रामस्थ ठेकेदार स्थानिक प्रशासनाने दिले नसल्याचे दुर्दैवी वास्तव तालुक्यातील या विविध भागात झालेल्या या मोठ्या उत्खननाने समोर आले आहे.

  २००५ साली झालेली दुर्घटना ही दरडी कोसळल्यामुळे झाली होती हे लक्षात घेता तालुक्यातील विविध भागांतून झालेले माती उत्खनन ही धोक्याची घंटा ठरू शकते.

  या संदर्भात केलेल्या माहितीनुसार दोन हजार पाच साली कोंडीवते परिसरात ज्याठिकाणी दरड कोसळून स्थानिक नागरिकांचा दुर्देवी मृत्यू झाला होता त्या परिसरातील माती सध्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाकरता वापरली जात असल्याचे आढळून आले आहे. याचप्रमाणे गोंडाळे, नडगाव राष्ट्रीय महामार्गालगत तसेच खाडीपट्ट्यातील टोळ, रायगड विभागात देखील अनेक गावांतून अशा प्रकारची माती उत्खनन केले जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे या विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात माती उत्खननाची कामेही सध्या सुरू आहेत याकडे स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधले असता याबाबत संबंधित विभागातील महसूल कर्मचा यांकडून लेखी अहवाल मागवला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

  या संदर्भात महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांना विचारणा केली असता संबंधित ठेकेदारांना ग्रामपंचायतीच्या पूर्व परवानग्या घेऊनच माती उत्खनन करावे असे सूचित केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय काही भागातून उत्खनन झाले असल्यास त्याची माहिती घेऊन त्या संदर्भात योग्य कारवाई केली जाईल असेही त्यांनी सूचित केले.

  राष्ट्रीय महामार्ग करिता नदीपात्रातील जुठे काढण्याचा प्रस्तावदेखील जिल्हा प्रशासनाकडून मंजूर करण्यात आला होता मात्र अद्याप पावेतो या ठिकाणची माती भराव अथवा नदीपात्रातील गाळ काढले जात असल्याचे चित्र फार मोठ्या प्रमाणावर दिसून आले नसल्याने प्रतिवर्षी या गाळामुळे महापुराचे पाणी वेगाने महाड शहरासह परिसरातील गावांतून शिरणार का? अशी शंका विचारली जाऊ लागली आहे.

  सन २००५ नंतर सावित्री नदी पात्रात तसेच काळ व गांधारी नदी पात्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर आलेल्या गाळाने नदीचे पात्र उथळ झाले असून त्याचा धोका पाण्याची पातळी वाढण्यास सहाय्यकारक ठरत असल्याचे मत स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त केले जात आहे.

  पावसाळी पूर्व आपत्ती नियंत्रण संदर्भात होणारी बैठक ही मे महिन्याच्या अखेरीस साधारणपणे आयोजित केली जाते त्यामुळे या बैठकीतच अशा संदर्भातील निर्णय घेतला जाऊ शकतो मात्र चालू वर्षी आलेल्या विविध नवीन समस्या लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने नेहमीच्या मे महिन्यातील बैठकीपूर्वीच संभाव्य धोका लक्षात घेऊन बैठक बोलवावी व यावर आपत्ती निवारणार्थ करावयाच्या कामांची आखणी करावी अशी मागणी नागरिकांकडून स्थानिक प्रशासनाकडे केली जात आहे.

  एकूणच महाडमधील प्रतिवर्षी येणारा महापूर लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वीच यासंदर्भात नागरिकांकडून आलेल्या सूचना तसेच शासनाचे असलेले निर्देश यांचे योग्य पध्दतीने अंमलबजावणी करण्याबाबत स्थानिक ग्रामपंचायत नगरपालिका यांना वेळीच आदेश दिल्यास पावसाळ्यापूर्वीच याबाबत असणारी कार्यवाही करणे शक्य होईल अशी अपेक्षा महाडकर नागरिक व्यक्त करीत आहेत.