रोहा डायकेम कंपनीत अपघातांची मालिका सुरूच  – ३० टक्के हायड्रोक्लोरिक अॅसिड टॅंक लिकेज

सुतारवाडी: रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक परिसरातील मे. रोहा डायकेम प्रा. लिमिटेड या कंपनीत गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता टॅंकरमधून हायड्रोक्लोरिक अॅसिड स्टोअरेज टॅंकमधे ट्रान्सफर करित असताना

 सुतारवाडी: रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक परिसरातील मे. रोहा डायकेम प्रा. लिमिटेड या कंपनीत गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता टॅंकरमधून हायड्रोक्लोरिक अॅसिड स्टोअरेज टॅंकमधे ट्रान्सफर करित असताना मुख्य स्टोअरेज टॅंक मोठ्या प्रमाणात लिकेज झाल्याने टॅंकमधील हायड्रोक्लोरिक अॅसिड बाहेर पडले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पांढऱ्या रंगाचा घशाला खवखवणारा, नाकाला व डोळ्यांना झोंबणारा अतितीव्र वायु हवेत पसरला. यावेळी कंपनीत काम करणाऱ्या साधारणत: २० कामगारांना तीव्र वायुची विषबाधा झाल्याने त्यांना धाटावसह रोठ बुद्रुक ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने प्रथमोपचारासाठी रोहा येथील डॉ. जाधव हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहेत. यावेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक गोष्टींची उणीव असल्याचे येथे दिसून आले. बघता बघता पांढऱ्या रंगाचा विषारी गॅस हवेसह संपूर्ण औद्योगिक परिसरासह धाटाव, रोठ, महादेववाडी या भागांत पसरल्याने यथील ग्रामस्थांना याचा त्रास होऊन नाक, घसा, डोळे झोंबत असल्याचे पहायला मिळाले. यावेळी तातडीने अग्नीशमन दल व पोलिस यंत्रणा व शासकिय  आधिकारीवर्ग घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर काही तासाने कंपनी सुरक्षितता आधिकारी चव्हाण घटनास्थळी पोहोचले.

रोहा डायकेम प्रा. लिमिटेड ही कंपनी मोठ्या प्रमाणात हेवी हजार्डस् रसायनांचे तसेच कलर डाईजचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करते. त्यामुळे या कंपनीत बाहेरून येणाऱ्या मालवाहू गाड्या, टँकर्स, कंटेनर ट्रकही मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात. बाहेरून येणारा कच्चामाल व कंपनीत तयार केलेले उत्पादन मोठ्या प्रमाणात वाहून नेण्यासाठी येथे ट्रक, टँकर्स, कंटेनर, टेम्पोची मोठी रेलचेल असते. मात्र या कंपनीत कामगार सुरक्षिततेबाबतीत नेहमीच हलगर्जीपणा केले जाते असे अनेकवेळा निदर्शनात आलेले आहे. कलर डाईजचे मोठ्या प्रमाणात ही कंपनी  उत्पादन काढत आहे. या कलर डाईजचे संपूर्ण धाटाव दशक्रोशीसह रोहा शहरापर्यंत लाल रंगाच्या डाईजचे सातत्याने प्रदुषण होत असते. या बाबतीत नेहमीच आजूबाजूचे कारखाने तसेच ग्रामस्थांच्या तक्रारी येतात.

 रोहा डायकेम कंपनीत गेल्या वर्षभरात सतत छोट्या मोठ्या अपघातांची मालिका सुरूच आहे. कधी आग लागणे, तर कधी रसायन गळती, तर कधी स्टीम लिकेज होऊन ध्वनी प्रदूषण असे अनेक प्रकार सातत्याने घडत असतात. असाच एक प्रकार काल सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान घडला आहे. बाहेरून हायड्रोक्लोरिक अॅसिडने भरलेला साधारणत: बारा हजार लिटरचा टॅंकर कंपनीच्या आतमधील स्टोअरेज टँकमधे ट्रान्सफर करित असतांना स्टोअरेज टँक बॉडी मधून  मोठ्या प्रमाणात लिकेज झाल्याने टँकरमध्ये असलेले १२ हजार लिटर ३०% हायड्रोक्‍लोरिक अॅसिड या कंपनीतील आवारामधे सांडल्याने येथे मोठ्या प्रमाणात केमिकल्स गळतीमुळे पांढऱ्या रंगाचा घशाला, नाकाला व डोळ्यांना झोंबणारा तीव्र गॅस निर्माण झाला होता. या जीवघेण्या घातक रसायनाची तीव्रता इतकी होती. की बघता बघता संपूर्ण परिसरात त्याचा विपरित परिणाम दिसू लागला होता. धाटाव  परिसरातील ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास होऊन डोळ्यांची आग होऊन घशाला खवखव होऊन श्वसनाचा त्रास होत होता. धाटाव ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले. 

यावेळी रोहा डायकेम कंपनीसमोर मोठी गर्दी करून झालेल्या अपघाताबद्दल तीव्र असंतोष येथील ग्रामस्थ व्यक्त करताना दिसत होते. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन  ताबडतोब ३० टक्के हायड्रोक्लोरिक ॲसिडची तीव्रता कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा मारा सुरू केला. मात्र पाणी वाढल्याने हे सर्व घातक रसायन कंपनीतील गटारा द्वारे बाहेरील गटार नाल्यातून मोठ्या प्रमाणात वाहात होते. किती दिवस अजून बेजबाबदारपणे वागून आमच्या जिवाशी खेळणार? कोरोना लॉकडाऊन बंदी उठल्यानंतर धाटावच्या प्रदूषणात नव्याने वाढ झाली आहे. रात्रीच्या अंधारात रोज नवीन प्रकारचे गंध आणि वास असलेले वायू वातावरणात सोडण्यात येत आहेत. लोकांचे आरोग्य धोक्यात आहे. कधी रात्रीच्या झोपेतच आम्हाला मृत्यू गाठेल याचा काही भरवसा उरलेला नाही. एक दिवस भोपाळची पुनरावृत्ती होईल, अशी भीती धाटाव ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या सततच्या प्रदुषणाने पर्यावरणात जल, वायू, भूमी प्रदूषण होऊन आमच्या परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. तसेच येथील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे.