रोहा आणि कोलाडमध्ये खरेदीसाठी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

सुतारवाडी: लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१मे लासंपला. त्या दिवशी रविवार असल्याने कोलाड तसेच रोहा शहरात असंख्य नागरिक खरेदीसाठी आले होते. मात्र त्यांनी डिस्टन्सिंगचे नियम न पाळल्यामुळे

 सुतारवाडी: लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे ला संपला. त्या दिवशी रविवार असल्याने कोलाड तसेच रोहा शहरात असंख्य नागरिक खरेदीसाठी आले होते. मात्र त्यांनी डिस्टन्सिंगचे नियम न पाळल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र कोलाड नाक्यावर सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत छोटे-छोटे विक्रेते आपल्या विक्रीसाठी आणलेल्या वस्तू रस्त्याच्या दुतर्फा विकत होते. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेले नागरिक मोठ्या प्रमाणावर एकत्रित दिसत होते. कोलाड पोलिसांच्या हे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सर्वांना रस्त्याच्या दुतर्फा असलेली दुकानं बंद करण्यास सांगितल्यानंतर  प्रत्येकाने छोटी-मोठी दुकाने बंद केली आणि त्या क्षणात त्या ठिकाणी शांतता निर्माण झाली. वटपौर्णिमा पाच तारखेला आहे तेव्हा छोट्या व्यापाऱ्यांनी करंडा फणी, फुले, फणस,  करवंद, पुजेसाठी लागणारे साहित्य विक्रीस ठेवले होते. तेव्हा खरेदी करणाऱ्यांची मोठी गर्दी केली होती. त्यामुळे कोलाड नाक्यावर जत्रेचे स्वरूप निर्माण झाले होते. डिस्टन्सिंगचे नियम कोणीही पाळताना दिसत नव्हता. त्यामुळे मोठी गंभीर स्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी वेळीच दक्षता घेऊन ही परिस्थिती आटोक्यात आणण्यात यश मिळवले. एकतर रोहा तालुक्यात कोरोनाचे काही रुग्ण सापडल्याने तेथे गांभीर्याने घेणे आवश्यक होते. जनतेनेसुद्धा काही दिवस सयंम बाळगणे गरजेचे आहे. कारण आजपर्यंत रोहा शहरात विविध ठिकाणांहून २२ हजारांपेक्षा जास्त नागरिक आलेले आहेत. त्यामुळे प्रशासन दक्षता घेण्याचे आवाहन करत आहे. त्याला जनतेने प्रतिसाद देणे अत्यावश्यक आहे नाहीतर रुग्णांमध्ये वाढ होण्यास वेळ लागणार नाही. कोलाडप्रमाणे रोहा बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर झुंबड उडाली होती. तेथेही सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. नागरिकांनी पोलिसांना तसेच प्रशासनाला सहकार्य केल्यास कोरोना हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही.