आरटीई अंतर्गत विद्यार्थी प्रवेशाची प्रतीक्षा संपणार

पनवेल : आरटीई अंतर्गत विद्यार्थी प्रवेशाची प्रतीक्षा संपणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश येऊन शाळा स्तरावर कागदपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण संचालकांनी दिले

पनवेल : आरटीई अंतर्गत विद्यार्थी प्रवेशाची प्रतीक्षा संपणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश येऊन शाळा स्तरावर कागदपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण संचालकांनी दिले आहेत. त्यानुसार २४ जूनपासून शाळांमध्ये कार्यवाही सुरू होणार आहे. 
  विनाअनुदानित स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. शैक्षणिक वर्ष सन २०२०-२१ या वर्षासाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशाबाबत ऑनलाईन अर्ज मागवून १७ मार्च रोजी लॉटरी काढण्यात आली आहे . या माध्यमातून राज्यातील १००९२० विद्याथ्यांची निवड झालेली आहे . तसेच ७५४६५ विद्यार्थ्यांची प्रतिक्षा यादी जाहीर केली आहे . पनवेल तालुक्यात २४५० विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळणार आहे. लॉकडाऊनमुळे पुढील प्रवेश प्रक्रीयेचे कामकाज झालेले नाही. कागदपत्रांची पडताळणी समितीच्या माध्यमातून केले जाते. त्या ठिकाणाहून पत्र मिळाल्यानंतर मग शाळेत प्रवेश दिला जातो.
 या पडताळणीसाठी मोठी गर्दी होत असल्याने  कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने  वेळेवर कागदपत्रांची पडताळणी झाली नाही. त्यामुळे  आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. आपल्या पाल्याला प्रवेश मिळेल की नाही. अशी चिंता अनेकांना वाटत होती. यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी शिक्षणाच्या अधिकारा अंतर्गत प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, असे राज्याच्या शिक्षण संचालकांना पत्र देऊन त्यात सामाजिक अंतराचा आधार घेत कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करावी त्याबाबत जिल्हा व तालुका पातळीवर मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात अशी मागणीही  केली होती. त्यानुसार शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश पत्र पाठवले आहे. सद्यस्थितीत पडताळणी केंद्रावर पडताळणी समितीकडे जावून कागदपत्रांची पडताळणी करणे अडचणीचे आहे . त्यामुळे फक्त या शैक्षणिक वर्षासाठी शाळा स्तरावर कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी करुन व संकलन करुन पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश देण्यात यावेत असे त्या आदेशात म्हटले आहे.