तब्बल १५० वर्षांनी भरलेल्या हत्ती तलावाचे संभाजीराजेंनी केले जलपूजन

रायगड – दरवर्षी पावसाळ्यात रायगडवर निसर्गाच्या कृपेने कापशी फुल्यासारखे दृष्य आसते. परंतु कोरोनामुळे राज्यातील सर्वत्र गड किल्ले तसेच इतर पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी आहे. त्यामुळे गडांवर पर्यटकांचा फेरफटका नाही. गेली अनेक वर्षांपासून खासदार संभाजी राजे पुरातत्व खात्यासह अनेक दुर्गसंवर्धन संघटनांना घेऊन रायगड किल्ल्याची डागडूजी करत आहेत. गडावरील नाणे दरवाजा असो नाहीतर गडाच्या पायी पायऱ्यांसाठी डागडूजी करत आहे. गेल्या १५० वर्षांपासून हत्ती तलाव तटस्थ भरला आहे. हे सर्व तलावाच्या डागडूजीमुळे शक्य झाले आहे. 

हत्ती तलाव तटस्थ १५० वर्षांनतर भरला आहे. याचे सर्वत्र व्हिडीओ व्हायरल होत होते. त्यामुळे संभाजी राजेंना देखील हत्ती तलावाचे दृष्य पाहण्याचा मोह आवरता आला नाही. ते काही सहकाऱ्यांना घेऊन गडावर पोहोचले आणि हत्ती तलावास भेट दिली. त्यांनी तलावातील पाण्याची पुजा केले तसेच तलावाचे पाणीही प्यायले.

 काय म्हणाले छत्रपती संभाजी राजे

भरलेला हत्ती तलाव बघण्याची ओढ मनाला अनेक दिवसांपासून लागली होती. तसेही रायगड संवर्धनाची जबाबदारी घेतल्यापासून कामांचा आढावा घेण्यासाठी गडावर नेहमी येतच असतो. पण, कोरोनामूळे  मनात असूनही येता येत नव्हते. हत्ती तलाव भरल्याची माहीती मिळाली तेव्हा पासून हा भरलेला तलाव पाहण्यासाठी मी फारच उत्सुक होतो.अखेर काल गडावर येऊन हे नयनरम्य दृष्य पाहीलेच.

भर पावसात रायगड पाहण्याचा आनंद वेगळाच! 

काठोकाठ भरलेल्या हत्ती तलावातील पाण्याचे पुजन यावेळी करण्यात आले. गडावरची निर्गुडीची पाने, रान फुले वाहून अगदी साधेपणाने परंतु मनोभावे जलपूजन केले.

 रायगड विकास प्राधिकरणाला मिळालेले हे यश अभूतपूर्व आहेच पण, गडावरील वास्तूंच्या इतिहासात प्राधिकरणाचे अमुल्य योगदान सुद्धा आहे. प्राधिकरणाच्या संबंधित सर्व सदस्य, तज्ञ, अधिकारी कर्मचाऱ्यांनी आणि कामगारांनी अहोरात्र केलेल्या  कष्टाचे आणि सर्व शिवभक्तांच्या पाठिंब्याचे हे फलीत आहे. 

हत्ती तलावात भरलेले निळेशुभ्र पाणी पाहून ते पिण्याचा मोह मी रोखू शकलो नाही. या तलावातील पाणी कदाचित शिवछत्रपती, संभाजी महाराज, राजाराम महाराजांनी सुध्दा पिले असेल, असा विचार मनात क्षणभर तरळून गेला. त्याकाळी असंख्य मावळ्यांची तहान या तलावाच्या भागवली असेल.

तलावाला अजूनही एक-दोन ठिकाणी गळती आहे, त्याच काम येत्या काही दिवसात करण्यात येईल.यापूर्वीही या तलावाची गळती काढण्यासाठी पाच ते सहा वेळा प्रशासनाकडून प्रयत्न झाले होतेअसे म्हणतात.पण, कुणालाही यश मिळाले नव्हते. यावेळा आपण यशस्वी झालो.