उरण तालुक्यातील गावांमध्ये निर्जंतुकीकरणासाठी जेएनपीटी प्रशासनाचा पुढाकार

उरण: जगभरात कोरोनाने घातलेला उद्रेक आपल्या देशात आणि राज्यात वेगाने पसरत आहे. उरण तालुका जेएनपीटी बंदरामुळे जागतिक व्यापाराचे केंद्र आहे. आपत्कालीन सेवे अंतर्गत जेएनपीटी बंदराचे कामकाज सुरु आहे.

उरण: जगभरात कोरोनाने घातलेला उद्रेक आपल्या देशात आणि राज्यात वेगाने पसरत आहे. उरण तालुका जेएनपीटी बंदरामुळे जागतिक व्यापाराचे केंद्र आहे. आपत्कालीन सेवे अंतर्गत जेएनपीटी बंदराचे कामकाज सुरु आहे. जागतिक व्यापाराच्या पार्श्वभूमीवर जगभरातून जहाजे जेएनपीटी बंदरात येत असल्याने तालुक्यातील जनतेच्या सुरक्षिततेबाबत जेएनपीटी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात दक्षता घेण्याचे काम सुरु केले असून या अंतर्गत जेएनपीटी प्रशासनाने गावागावांतील परिसरात निर्जंतुकीकरणाचे काम वेगाने सुरु केले असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.  

उरण तालुक्यात आत्तापर्यंत ४ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर जेएनपीटी प्रशासनाने आपल्या परिसरातील गावागावतून सोडियम हायपो क्लोराईड रसायनाची फवारणी सुरु केली असून जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांच्या आदेशाने व अग्नि सुरक्षा विभागाचे सह.व्यवस्थापक संजय सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली गावागावतून जेएनपीटीच्या अग्निशमन दलाचे जवान रसायन फवारणीचे काम करत आहेत. 

निर्जंतुकीकरणासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन सेवा कार्य बजाविणारे अग्निशमन दलाचे उप अधिकारी जगजीवन  भोईर, यांनी केले असून आत्तापर्यंत परिसरातील जसखार,सोनार,सवरखार,पागोटे,नवघर, भेंडखळ, कुंडेगाव, जासई,  रांजणपाडा, सुरुंगपाडा, एकटघर,आणि जेएनपीटी वसाहत संकुलामध्ये फवारणी करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याकामी अग्निशमन दलाचे जवान एन.बी.पाटील,जी.डी. पाटील,ए.एम पाटील, जी.जे.तांडेल, महाकाल, मंगेश जाधव आणि सचिन सोनकर यांनी चांगले सहकार्य केले आहे.मात्र हे सेवाकार्य बजावीत असताना जवानांना पी.पी.ई कीट व पाईपची लांबी वाढविणे अत्यावश्यक असल्याची खंत जवानांनी नवराष्ट्रच्या प्रतिनिधीजवळ व्यक्त केली.