रोहा-कोलाड राज्यमार्गावरील पूलांना सुरक्षित कठडे बांधल्याने नागरिकांमध्ये समाधान

रोहा - रोहा तालुक्यातील महत्वाचा समजला जाणारा व नेहमीच भरगच्च वर्दळीचा असलेल्या रोहा - कोलाड राज्यमार्गावर धाटाव औद्योगिक परिसरातून येणारा मुख्य गटारनाला आहे. हा नाला रोहा कोलाड

 सुतारवाडी – रोहा तालुक्यातील महत्वाचा समजला जाणारा व नेहमीच भरगच्च वर्दळीचा असलेल्या रोहा – कोलाड राज्यमार्गावर धाटाव औद्योगिक परिसरातून येणारा मुख्य गटारनाला आहे.  हा नाला रोहा कोलाड राज्यमार्गाखालून वाहात खाली कुंडलिका नदीला जाऊन मिळतो. हे  मुख्य गटार रोहा कोलाड राज्यमार्गा खालून वाहत जाण्यासाठी येथे सार्वजनिक बांधकाम खात्याने गेल्या ८ – ९ वर्षापूर्वी पूल बांधलेले आहे. मात्र या पुलाला दोन्ही बाजूला सुरक्षित कठडे बांधलेले नव्हते. त्यामुळे या पुलावरुन मिनीडोअर, दुचाकी, चारचाकी  अशा अनेकांचे अपघात होऊन काहींना आपले जीव गमवावे लागलेले आहे. त्यामुळे या मार्गावरील सर्वच पुलांना सुरक्षित कठडे बांधण्याची मागणी करण्यांत आली होती. याची गांभिर्याने दखल रोहा सार्वजनिक बांधकाम विभागाने घेऊन आता  काही पुलांना सुरक्षित कठडे बांधण्यात आलेले आहेत.

तसेच याच मार्गावरील काशिनाथ धाटावकर यांच्या  घरासमोरील पुलालासुद्धा सुरक्षित कठडे नाहीत. बाजूलाच आ. अवधूत तटकरे यांचे निवासस्थान आहे. मात्र या पुलालासुद्धा दोन्ही बाजूला सुरक्षित कठडे बांधले नसल्याने येथे मोठी अपघाती परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी धाटाव येथील अपघात झाला होता. मिनीडोअरमधे प्रवासी नसल्याने फक्त मिनीडोअर चालकच असल्याने थोडक्यात चालक बारंबाल बचावला होता. मात्र मिनीडोअरचे मोठे नुकसान झालेले होते. तर एक दुचाकीला अपघात झाला होता या अपघातात दुचाकी स्वाराला आपले प्राण गमवावे लागले होते. याला जबाबदार कोण? असे येथील प्रवासी व कामगार वर्गातून चर्चा सुरु होती. 

रात्री अपरात्री या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. आता पावसाळा काही दिवसांत सुरु होणार आहे. धाटाव येथील कैलास पवार यांच्या घरासमोरील पुल, एक्सेलस्टॉप तसेच काशिनाथ धाटावकर यांच्या घरासमोर असलेल्या या पुलांना ताबडतोब सुरक्षित कठडे बांधण्यात यावेत. अशी मागणी काही महिन्यापूर्वी करण्यांत आली होती. त्याप्रमाणे रोहा सार्वजनिक बांधकाम विभागाने याची गांभिर्याने दखल घेत या मार्गावरील काही पुलांना सुरक्षित कठडे बांधले आहेत. त्यामुळे रोहा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या चांगल्या कामगिरीबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहेत. 

उर्वरीत पुलांनाही सुरक्षित कठडे पावसाळ्यापूर्वी बांधण्यात यावेत. तर याच राज्यमार्गावर काही  ठिकाणी खड्डे पडलेले दिसत आहेत. तसेच या राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूकडील साईड पट्ट्याही मोठ्याप्रमाणात खचलेल्या आहेत. याबाबतीत वारंवार निदर्शनात आणून दिलेले आहे. तरी सा. बां. खाते रोहा यांनी याबाबतीतही लक्ष वेधून खचलेल्या साईडपट्ट्या भरण्यासाठी पुढाकार घ्यावा. कारण खचलेल्या साईडपट्टयांमुळे या राज्यमार्गावर अनेकवेळा अपघात झालेले आहेत. राज्यमार्गाचे नव्याने डांबरीकरण व रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील साईड पट्टयाही भरुन घेणे गरजेचे आहे. याच मार्गावर महाराष्ट्रातील सर्वात जुने धाटाव औद्योगिक क्षेत्र वसलेले आहे. त्यामुळे या मार्गावर कामगारांची नेहमीच वर्दळ असते. तसेच रोहा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने तालुका बाजारासाठी ग्रामिण भागातुन नागरिकांचीही या राज्य मार्गावरुन वर्दळ असते. याच मार्गावर अनेक विद्यालये असल्याने विद्यार्थी वर्गाचीसुद्धा मोठी संख्या या मार्गावरुन ये-जा करत असते.