savitri river

गेल्या काही दिवसांपासून महाड(Mahad) औद्योगिक वसाहतीमधील(MIDC) नदी नाल्यांमध्ये रासायनिक (Chemical Water)सांडपाणी सोडण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे मासे मरण पावण्याच्या घटना घडत आहेत.

    महाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील(MIDC) एका कारखान्याने आपले रासायनिक सांडपाणी सावित्री नदीपात्रात(Savitri River Polluted) सोडण्याचा उद्योग केल्याचे आज आढळून आले. या सांडपाण्यामुळे औद्योगिक वसाहतीपासून थेट महाड शहरापर्यंतचे सावित्री नदी पात्र लालभडक झाल्याचे आणि मोठ्या प्रमाणावर तवंग आल्याचे दिसून आले.

    गेल्या काही दिवसांपासून महाड औद्योगिक वसाहतीमधील नदी नाल्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे मासे मरण पावण्याच्या घटना घडत आहेत. ही घटना घडल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवते. मात्र पुढे कोणतीही कारवाई होत नसल्याने कारखाने असे उद्योग करण्याचे धाडस दाखवित असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जातोय.

    आज सावित्री नदी पात्राचा जवळपास दहा किलो मीटरचा भाग लाल रंगाच्या पाण्याने आणि तवंगाने भरला होता. गेल्या वर्षीदेखील असा प्रकार घडला होता. ज्या कारखान्याने गेल्या वर्षी हा प्रकार केला होता त्याच कारखान्याकडून आजही हा प्रकार करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज प्रदूषण नियंत्रण मंडळाने व्यक्त केला आहे.

    दरम्यान, वारंवार होणारे हे प्रकार बंद न झाल्यास त्याचप्रमाणे संबंधित कारखाने शोधून त्यांच्यावर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सावित्री काठावरील गावांतील ग्रामस्थांनी दिला आहे.