
गिधाडांच्या(vulture conservation) दोन प्रजातींवर रायगड जिल्ह्यातील(raigad) म्हसळा येथील चिरगांव गावातील देवराईमध्ये गेली २२ वर्ष संवर्धनाचे काम करणाऱ्या सिस्केप संस्थेच्या प्रेमसागर मेस्त्री(premsagar mestri) यांचा इंटरनॅशनल एक्सलन्स ॲवार्ड बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डस् (IEA) या संस्थेने पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
महाड : गिधाडांच्या(vulture conservation) दोन प्रजातींवर रायगड जिल्ह्यातील(raigad) म्हसळा येथील चिरगांव गावातील देवराईमध्ये गेली २२ वर्ष संवर्धनाचे काम करणाऱ्या सिस्केप संस्थेच्या प्रेमसागर मेस्त्री(premsagar mestri) यांचा इंटरनॅशनल एक्सलन्स ॲवार्ड बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डस् (IEA) या संस्थेने पुरस्कार देऊन गौरव केला आहे. सिस्केप संस्थेच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण, जैवविविधतेचे रक्षण, लुप्त होत जाणाऱ्या वन्यजीवांचे संवर्धन, संरक्षण याविषयावर गेली २२ वर्षे प्रेमसागर मेस्त्री व त्यांची टीम काम करीत आहे.
आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होत असताना परिसरातील पक्षांचे वर्णन करणारा प्रेमसागर मेस्त्री काही कालावधीतच लुप्त होत चाललेल्या पक्षांबाबत संवेदनशील झाला. बगळे, धनेश, गरूड, करकोचे या पक्षांची घरटी, त्यांचे अधिवास, स्थलांतरीत पक्षांचा प्रवास याविषयावर सह्याद्री निसर्ग मित्र व त्यानंतर सिस्केप या स्वत:च्या संस्थेच्या माध्यमातून काम सुरू केले. काही वर्षातच सिस्केपकडे अनेक तरूण आकर्षित झाले आणि महाडमध्ये आज अनेकजण पक्षीमित्र, सर्पमित्र म्हणून कार्यरत आहेत.
गिधाडांच्या संवर्धनाचे काम त्यांनी १९९९ पासून सुरू केले. गिधाडांच्या संपुष्टात येणाऱ्या प्रजातींचा शोध घेत असताना मेस्त्री यांना म्हसळा, श्रीवर्धन येथे गिधाडाची तुरळक घरटी आढळून आली. प्रेमसागर मेस्त्री यांना या घटनेने काम करण्यास प्रोत्साहन मिळाले. या संपत जाणाऱ्या गिधाडांच्या प्रजाती कशा संवर्धीत केल्या जातील यावर त्यांनी अनेक पुस्तके वाचून काढली आणि कामास सुरुवात केली. संपुष्टात येणाऱ्या पांढऱ्या पाठीचे गिधाड व लांब चोचीचे गिधाड या दोन प्रजातीचा या भागात जास्त संचार असल्याने त्यांनी म्हसळा येथील चिरगांव या देवराईमध्ये काम सुरु केले. गिधाड संवर्धन व संशोधन केंद्राची स्थापना करून चिरगाव बागाची वाडी येथे प्रेमसागर मेस्त्री यांनी ग्रामस्थांसमोर या पक्षाबाबत जनजागृती केली. ग्रामस्थांनी मेस्त्री यांना चांगला प्रतिसाद दिला आणि संवर्धन कामात चिरगावच्या सर्वच वाड्यांतून ग्रामस्थांनी सोबत केली. त्याचप्रमाणे नाणेमाची येथे लांब चोचीच्या गिधाडांसाठी अभ्यास संवर्धन संशोधन केंद्राची स्थापना केली. वाळण ते वाकी व शेवते परिसरातील ग्रामस्थांनी देखील गिधाड संवर्धनासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मृत जनावरांना या गिधाडांना पुरविण्याचे काम आजही सिस्केप संस्थेचे सदस्य मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या कामाबरोबरच निसर्ग सहली, हिमालयीन सफर, गोवा सायकलींग, चित्र प्रदर्शने, व्याख्याने, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर अभ्यास शिबीर सारखे उपक्रम करून प्रेमसागर मेस्त्री यांनी आजपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबद्दल ओढ निर्माण केली आहे. आजमितीस श्रीवर्धन, म्हसळा, मुरूड, पाली, महाड, मंडणगड, परिसरात आजमितीस साडेतीनशेहून अधिक गिधाडे पहावयास मिळतात. म्हसळा, रोहा, महाड वनविभागासोबत केलेल्या या कामामुळे शासकीय पातळीवर देखील प्रेमसागर मेस्त्री यांची या कामाबाबत ओळख आहे. त्यामुळे शासकीय पातळीवर पक्षी संवर्धनाच्या विशेष कामात प्रेमसागर मेस्त्री यांचे मार्गदर्शन घेतले जाते.
परदेशातील अनेक पक्षी शास्त्रज्ञांसह ऑनलाईन संवाद ठेवल्याने प्रेमसागर मेस्त्री यांच्या या कामाची दखल आंतरराष्टीय पक्षीशास्त्र क्षेत्रात घेतली जाते. गेल्या दहा वर्षात रशियासह, रशियातील अलताही, माउंटन रिझर्व्ह, उत्तर रशियातील डार्विनस्की रिझर्व्ह, दलदलतैगा, दक्षिण रशियातील ताशातान या मंगोलिया बाॅर्डरवर, चेरेपोव्हेस्ट ते सेंट पिटरबर्ग्स या दरम्यान असलेल्या सायबेरीयन जंगल पट्ट्यात, मंगोलिया येथील इकनार्थ या मध्य वाळवंटी प्रदेशात, उत्तर स्टेपीचा गवताळ प्रदेश, फिलीपिन्स येथील ९ बेटांवर प्रेमसागर मेस्त्री यांना विविध शास्त्रीय परिषदांमध्ये खास निमंत्रीत केले गेले आहे. फिलीपीन इगल फाउंडेशन या संस्थेसोबत फिलीपीन इगल कॉन्झर्व्हेशन सेंटर, इंडोनेशिया, बाली, मलेशिया, साऊथ कोरिया आदी प्रांतात एशियन रॅप्टर्स रिसर्च कॉन्झर्व्हेशन नेटवर्क या आशियाई शिकारी पक्षी परिषदेच्या विविध शास्त्रीय पक्षीसंशोधन मोहीमेमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे.
२० वर्षातील गिधाडांचे संवर्धन, बुबी या स्थलांतरीत पक्षांचे दापोली येथे केलेले रेस्क्यू आणि सावित्री नदीतील मगरींचे संवर्धन या शास्त्रीय अभ्यासाबाबत इंटरनॅशनल एक्सलंन्सी ॲवार्ड या संस्थेकडून ९ जानेवारी रोजी मुंबईतील अधेरी पश्चिम येथील मुक्ती कल्चरल सेंटरमध्ये प्रेमसागर मेस्त्री यांना आयईए संस्थेचे अध्यक्ष संदीप सिंह, उपाध्यक्ष डाॅ. अनिल नायर, सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर अर्चना खोचर, मिस इंडिया सिमरन आहुजा यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी संस्थेच्या सदस्या श्रद्धा जोशी, डाॅ. सृजन धारप उपस्थित होते. या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या गौरवाबद्दल महाडसह कोकणातील पक्षीमित्रांनी प्रेमसागर मेस्त्री यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले आहे.