नुकसानाची परीणामकारक मांडणी केंद्राकडे करावी लागणार – रायगड दौऱ्यामध्ये शरद पवारांनी मांडले मत

अलिबाग: निसर्ग चक्रीवादळाने कोकणवासियांचे मोठे नुकसान केले आहे. परंतु हे नुकसान केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे योग्यरितीने मांडले गेले पाहिजे. महसूल विभागाकडून पंचनामे झाल्यावर लवकरात लवकर

अलिबाग: निसर्ग चक्रीवादळाने कोकणवासियांचे मोठे नुकसान केले आहे. परंतु हे नुकसान केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे योग्यरितीने मांडले गेले पाहिजे. महसूल विभागाकडून पंचनामे झाल्यावर लवकरात लवकर वादळपिडितांना मदत मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रीवर्धन येथे व्यक्त केला. 

मागील आठवड्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने केलेल्या नुकसाची पाहणी करण्याकरीता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज रायगड जिल्ह्याचा दौरा केला. श्रीवर्धन येथील पत्रकार परिषदेत त्यांनी चक्रीवादळग्रस्तांच्या समस्यांवर भाष्य केले. केंद्र सरकारकडे नुकसानाचे गांभीर्य योग्य पद्धतीने मांडले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. पवार यांनी नुकसानाचे पंचनामे त्वरीत झाले पाहिजेत असे सांगितले. वीज पुरवठा येत्या पाच ते सहा दिवसात पूर्ववत केला पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पवार कोकण दौऱ्याची सुरूवात रायगडपासून झाली असून पुढे रत्नागिरी जिल्ह्यालाही भेट देऊन ते वादळग्रस्त कोकणवासियांशी ते संवाद साधणार आहेत. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे पवार यांच्या समवेत आहेत. आज सकाळी पवार यांनी माणगावात शेतकऱ्यांशी चर्चा केली. पवार यांनी थेट बागायतदार, पर्यटन व्यावसायिक आणि शेतकरी यांच्याशी संवाद साधीत त्यांचे प्रश्न समजून घेतले. माणगाव आणि म्हसळ्यात वादळाने केलेल्या नुकसानीचा आढावा घेतला. शरद पवार यांनी म्हसळे येथे वादळात नुकसान झालेल्या मदरसा आणि उपजिल्हा रुग्णालय येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. म्हसळेनंतर ते श्रीवर्धन तालुक्यात दिवे आगार येथे रवाना झाले. पवार यांनी बागायतदारांना अनेक प्रश्न विचारले.

पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात श्रीवर्धन तालुक्यात अनेक फलोत्पादन योजनांच्या अंतर्गत फळांच्या बागा विकसित करण्यात आल्या होत्या. ती झाडे उध्द्वस्त झाल्याचे पवार यांना सांगण्यात आले. आमच्या बागा उजाड झाल्यावर मुलेबाळे आणि पत्नी आसवे गाळीत आहे, असेही बागायतदारांनी पवार यांना सांगितले. कोकणातील बागायतदाराचे १०० टक्के नुकसान झाले आहे, असे भावनाविवश होत बागायतदारांनी सांगितले. जिल्हा परिषद कृषी सभापती बबन मनवे, पंचायत समिती सभापती उज्वला सावंत, उपसभापती भधुकर गायकर, कोळी समाज अध्यक्ष अनिल बसवत यांनी यावेळी शरद पवार यांच्यासमोर नुकसानीच्या व्यथा मांडल्या. नारळ-सुपारीच्या बागा उभ्या करण्यासाठी १० वर्षे लागतील अशी व्यथा त्यांनी पवार यांच्यासमोर मांडली. उर्वरीत झाडे पावसाळ्यात किनारपट्टीवर सुटणाऱ्या वाऱ्याच्या धोक्याखाली आहेत असे दिवेआगर येथील काजू बागायतदाराने सांगितले.

शरद पवार यांनी पर्यटनाबाबतही येथील व्यावसायिकांना विचारले. करोनामुळे पर्यटन व्यवसाय बुडाला अशी माहिती पवार यांना देण्यात आली. पावसाळ्यातही खास येथील नारळी पोफळीची झाडे आणि धुवाँधार पाऊस पाहण्यासाठी पर्यटक महाराष्ट्रातून येत असत पण ती झाडेच आता राहिली नाहीत. पर्यटन व्यवसायही आता मंदीकडे गेला आहे