Shetkari kamgar party Dhadak Morcha at the Collectors Office in Alibag
केंद्राच्या जनविरोधी कृषी-कामगार कायद्यांना विरोध; शेकापचा अलिबागमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

आता २७ नोव्हेंबरपर्यंत भारतात ९२ लाखाच्यावर कोरोना रुग्ण झालेले असून, एक लाख ३० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मोदी कोरोना युद्ध जिंकले का असा सवाल अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कॉ. अशोक ढवळे यांनी यावेळी उपस्थित केला. कोरोना काळात युपीतील नागरिक पायी चालत गेले. मात्र त्यांनाही मोदींनी एकही पैसा दिला नाही.

  • वादळातील नुकसान भरपाई, वीजबिल माफी, अतिवृष्टीतील नुकसान भरपाई द्या
  • मोर्चा वेळी केल्या मागण्या

अलिबाग  : केंद्राच्या जनविरोधी कृषी-कामगार कायद्यांच्या विरोधात शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाने आयोजित केलेला मोर्चा अखेर आज दुपारी रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला असताना या मोर्चाला अलिबाग पोलिसांनी जनरल अरुणकुमार वैद्य शाळेजवळ अडविला. संपूर्ण जिल्हाभरातून मोर्चात सहभागी झालेल्या शेकापच्या या भव्य मोर्चाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. यावेळी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या एल्गार मोर्चात अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कॉ. अशोक ढवळे, माजी आमदार पंडितशेट पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे,  समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, महिला आघाडीच्या नेत्या नगरसेविका चित्रलेखा पाटील, रायगड बाजारचे अध्यक्ष नृपाल पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी, जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य, तालुका चिटणीस, सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शेकापच्या अलिबागेतील मुख्य कार्यालयापासून या मोर्चाला सुरवात झाल्यानंतर मोर्चा महाविर चौक बालाजी नाका, मारुती नाका, स्टेट बँक ऑफ इंडिया, वेधशाळामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा जात असतानाच अलिबागच्या पोलिसांनी मोर्चाला जनरल अरुणकुमार वैद्य विद्यालयाजवळ अडविल्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.

यावेळी आमदार जयंत पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कॉ. अशोक ढवळे यांनी मोर्चेकरांना मार्गदर्शन केले. कोरोना असो किंवा चक्रीवादळ असो यात स्थानिक शेतकरी भरडला गेला आहे. बागायतदारांचेही नुकसान झाले आहे. सरकारने मदत केलेली असली, तरी ती तुटपुंजी असल्याचे पोणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी यावेळी सांगितले.

केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लावण्याचा घाट रचला असून, याविरोधात सर्वानीच पेटून उठले पाहिजे असेही ते म्हणाले २४ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर करतानाच आपण कोरोना युद्ध लवकरच जिंकणारच असे सांगत असताना त्यावेळी भारतात ५२४ कोरोना रुग्ण होते, तर १० जणांचा मृत्यू झाला होता.

आता २७ नोव्हेंबरपर्यंत भारतात ९२ लाखाच्यावर कोरोना रुग्ण झालेले असून, एक लाख ३० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मोदी कोरोना युद्ध जिंकले का असा सवाल अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कॉ. अशोक ढवळे यांनी यावेळी उपस्थित केला. कोरोना काळात युपीतील नागरिक पायी चालत गेले. मात्र त्यांनाही मोदींनी एकही पैसा दिला नाही.

कोरोना काळात देशातील १५ हजार कोटी नागरिक बेरोजगार झाले. शिवाय अनेकजण भुकेने मेले असतानाच त्यावर शेतकरी आणि कामगारविरोधी धोरण राबविण्याचे प्रयत्न सुरु करून जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार मोदी सरकारने केल्याचा आरोप ढवळे यांनी केला. भांडवलदार आणि सर्वसामान्यांना यापुढे विजेचे दर समान राहणार असल्याने जीवनावश्यक वस्तूंपेक्षाही विजेचे दर वाढणार असल्याने शेकापला त्याविरोधात संघर्ष करावा लागणार आहे.

रायगड जिल्ह्यातील अल्पदराने ज्या जमिनी भांडवलदारांनी विकत घेतलेल्या आहेत. त्या चढ्याभावाने विकण्याचा घाट घातला जात असून, त्यापैकी ५० टक्के रक्कम शेतजमिनीच्या मूळ मालकाला मिळालीच पाहिजे असे मत आमदार जयंत पाटील यांनी यावेळी मांडले. तसेच कोणीकोणी रायगडमध्ये जागा घेतल्या आहेत. त्यासाठी पैसे कोठून आणले याचा शोध शेकाप कार्यकर्त्यांनी लवकरच घ्यावा असेही त्यांनी य़ावेळी सांगितले.

केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लावण्याचा घाट रचला असून, तो आम्ही कदापीही यशस्वी होऊ देणार नाही. रायगड जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळात झालेले नुकसान अजूनही नुकसानग्रस्तांना भरुन देण्यात आलेले नाही. कित्येक नुकसानग्रस्त अद्यापही मदतीपासून वंचितच असून, झाडनिहाय मदत देतानाही अतिशय अन्याय करण्यात आला आहे. कोरोनामुळे ओढवलेली भयंकर परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आर्थिक मदत देण्याची गरज असून, छोटया मोठया उद्योगांना सरकारने मदत करण्याची गरज आहे. या काळात आलेले भरमसाठ वीजबील पूर्णपणे माफ केलेच पाहिजे असेही पाटील म्हणाले.