उलवा नोड परिसरात बनविण्यात येत असलेले डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची शिवसेनेची मागणी

पनवेल : गव्हाण भागातील शेलघर गावाला लागून उलवा नोड परिसरात नव्याने डम्पिंग ग्राऊंड बनविण्यात येत असून ते बंद करावेत, अशी मागणी शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील तसेच कामगार नेते महेंद्र घरत

पनवेल : गव्हाण भागातील शेलघर गावाला लागून उलवा नोड परिसरात नव्याने डम्पिंग ग्राऊंड बनविण्यात येत असून ते बंद करावेत, अशी मागणी शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील तसेच कामगार नेते महेंद्र घरत यांनी सिडकोच्या संबंधित अधिकार्‍यांना निवेदन देवून केली आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना सुद्धा निवेदन देवून सदर डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. गव्हाण जवळील शेलघर येथील परिसरात मुंबईतील अस्लम शेख नामक व्यक्तीकडून सातत्याने कचरा टाकण्यात येत आहे. ह्या कचर्‍यामुळे येथील परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे व जवळपास असलेल्या विहिरीही दूषित झालेल्या आहेत. त्यामुळे या भागातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. उलवा नोड येथे नवी मुंबई विमानतळ बाधीत प्रकल्पग्रस्तांच्या पुर्नवसनाची व्यवस्था तेथे करण्यात आली आहे. 

कोरोनाची महामारी असताना या प्रदूषणाचा फार मोठा फटका या भागाला बसण्याची शक्यता आहे. या संदर्भात शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार व प्रकल्पग्रस्तांचे नेते बबन पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना याबाबत निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची विनंती केली आहे. कामगार नेते महेंद्र घरत आणि बबन पाटील यांनी  मॅनेजिंग डायरेक्टर सिडको, जिल्हा अधिकारी रायगड, पोलीस आयुक्त नवी मुंबई, प्रांत अधिकारी व तहसिलदार उरण यांची भेट घेऊन  त्यांनाही निवेदन दिले आहे.