धक्कादायक प्रकार! स्वयंपाक घरात घुसून महिलेची निर्घृण हत्या

रायगड : रायगडमध्ये स्वयंपाक घरात घुसून एका महिलेची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज सकाळी रायगडमधील तळोजा वसाहतीमध्ये घडली. एका ५० वर्षीय महिलेची हत्या झाल्याने येथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या मृत महिलेचं वय ५० वर्ष असून रेखा शर्मा असे तिचे नाव आहे. ही मृत महिला तळोजा सेक्टर ११ मधील मेट्रो पॉईंट या इमारतीमध्ये राहत होती. ही महिला तिच्या स्वयंपाक घरात असताना, घरात कुणीही नव्हते. त्यामुळे याच संधीचा फायदा घेऊन मारेकऱ्यांनी तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून मारेकरी पसार झाले.

दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, त्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. तळोजा पोलिसांनी या घटनेची चाचपणी केली. परंतु ही हत्या नेमकी कशी झाली, कोणी केली, हे अद्यापही अस्पष्ट आहे. तसेच पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.