छोटे फेरीवाले आणि विक्रेत्यांना मदत म्हणून ‘त्या’ महिलेने घेतला मास्क शिवण्याचा वसा

पनवेल : पनवेलमध्ये एका मोठ्या सोसायटीतील २ बीएचकेमध्ये रहाणारे सहा माणसांचे कुटुंब. घरात ९ वर्षाच्या छोट्यापासून ९० वर्षाच्या पणजी पर्यंतची सहा माणसे, कर्ता पुरुष नाही. श्रध्दा पटेल, तिची दोन

पनवेल : पनवेलमध्ये एका मोठ्या सोसायटीतील २ बीएचकेमध्ये रहाणारे सहा माणसांचे कुटुंब. घरात ९ वर्षाच्या छोट्यापासून ९० वर्षाच्या पणजी पर्यंतची सहा माणसे, कर्ता पुरुष नाही.  श्रध्दा पटेल, तिची दोन लहान मुले, सासू सासरे आणि ९० वर्षाची आजेसासू. ती खाजगी स्कूलमध्ये  नोकरी करून घर चालवते. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे पगार नाही. घरात खायला काहीच नाही. मोठ्या सोसायटीत राहत असल्याने मदत कोण देणार आणि मागायची तरी कशी असा प्रश्न श्रद्धा यांच्यापुढे पडलेला. आपल्या एका सहकारी मैत्रिणीला परिस्थिती सांगितल्यावर पत्रकारामार्फत तिला नगरसेवक व सामाजिक संस्थेकडून मदत मिळाली. त्यावेळी तिचे डोळे पाणावले.

आपल्याला मदत मिळाल्यावर आपणसुध्दा कोणाला तरी मदत केली पाहिजे, असे श्रद्धा यांना वाटू लागले. आपल्या सोसायटीच्या बाहेर बसणारे भाजीवाले, फळ विक्रेते आणि छोटे फेरीवाले आपला धंदा करीत असताना मास्क वापरत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना विचारल्यावर मास्कची  किंमत  ( त्यावेळी ८० ते १००रुपये ) जास्त असल्याने  घ्यायला परवडत नसल्याचे समजले. तिच्याकडे शिलाई मशीन होते. मग आपण यांना मास्क शिऊन दिले तर असा विचार श्रध्दा पटेल यांच्या मनात आला. घरात कॉटनचे ड्रेस मटेरियल होते. त्यापासून मास्क बनवून या छोट्या विक्रेत्यांना दिले. सोसायटीतील शिक्षक असलेल्या सुषमा गुप्ता यांनी आपण सगळ्यांनी मिळून असे मास्क बनवून वाटले तर असा विचार बोलून दाखवल्यावर महिलांचा ग्रुप तयार झाला. प्रत्येकीने एक एक जबाबदारी घेतली कोणी कापड दिले, कोणी दोरा व इतर साहित्य दिले. श्रध्दा पटेल यांनी आत्तापर्यंत दोन -अडीचशे मास्क फावल्या वेळात घरी बनवले आहेत आणि अजून बनवत आहेत. हे मास्क त्या विविध सामाजिक सेवाभावी संस्था, रुग्णालये, तसेच मोलमजुरी करणाऱ्या मजुरांना मोफत वाटतात. आपल्या मदतीला कुणीतरी उभे राहीले तर आपणही कुणाची तरी जमेल तशी मदत करावी, या भावनेने श्रद्धा पटेल यांच्यासारखे अनेक जण काम करू लागले तर अनेक गोष्टी सोप्या होतील.