श्रीवर्धन तालुक्यातला ‘तो’ कोरोना रुग्ण वरळीचा रहिवासी, मूळ गावी येऊन गेल्याची प्रशासनाला आज झाली जाणीव

श्रीवर्धन: आज दुपारी श्रीवर्धन तालुक्यात कोरोनाचा रुग्ण सापडला अशी बातमी एका वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध करण्यात येत होती. मात्र वस्तुस्थिती पाहता हा रुग्ण वरळी कोळीवाड्यात राहत होता. तो ४ एप्रिल रोजी

श्रीवर्धन: आज दुपारी श्रीवर्धन तालुक्यात कोरोनाचा रुग्ण सापडला अशी बातमी एका वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध करण्यात येत होती. मात्र वस्तुस्थिती पाहता हा रुग्ण वरळी कोळीवाड्यात राहत होता. तो ४ एप्रिल रोजी श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते या आपल्या मूळ गावी आपल्या कुटुंबासह दाखल झाला होता. वास्तविक पाहता मुंबईहून आलेल्या लोकांना होम क्वारंटाईन करणे गरजेचे होते. परंतु भोस्ते ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच गणेश जावळेकर यांचा भाऊ असलेल्या या रुग्णाची  कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता त्याला गावामध्ये दाखल करण्यात आले होते. याबाबत गावातील काही जागरूक नागरिकांनी वैद्यकीय तपासणी केल्याशिवाय मुंबईहून आलेल्या नागरिकांना गावात घेऊ नका, असे सुचवले होते. मात्र ग्रामपंचायत सरपंच पद प्रभारी असलेल्या गणेश जवळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या नागरिकांना दमदाटी केली. ४ एप्रिल रोजी दाखल झालेला तो रुग्ण सात ते आठ एप्रिल तारखेच्या दरम्यान अस्वस्थ वाटल्याने श्रीवर्धन येथील एका खासगी दवाखान्यात गेला. परंतु त्या डॉक्टरांनी त्यांना शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.

शासकीय रुग्णालयात गेल्यानंतर त्या रुग्णाची लक्षणे कोरोना सारखी वाटल्याने त्या ठिकाणच्या डॉक्टरांनी त्यांना मुंबई येथे हलविण्याचा सल्ला दिला. परंतु अंदाजे १० एप्रिल रोजी मुंबईत पाठवलेल्या रुग्णाचा कोरोनाचा रिपोर्ट १७ एप्रिल रोजी कसे मिळाले ही गोष्ट अनाकलनीय आहे. जर  कोरोनाची लक्षणे असलेला रुग्ण १० एप्रिल रोजी मुंबईला पाठवण्यात आला तर त्यानंतर त्याच्या असलेल्या अन्य कुटुंबियांना होम क्वारंटाईन करणे अत्यंत आवश्यक होते. परंतु प्रशासनाकडून त्याच्या कुटुंबियांना होम क्वारंटाईन करण्यात आले नव्हते. आज दुपारी एका वृत्तवाहिनीवर श्रीवर्धनमध्ये कोरोना रुग्ण कुठे सापडला हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर श्रीवर्धन तालुक्याचे सर्व प्रशासन खडबडून जागे झाले.  त्यानंतर श्रीवर्धन शहरापासून ४ किलोमीटरवर असलेल्या भोस्ते गावाला सील करण्यात आले. तसेच पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णाच्या तीन मुलींना क्वारंटाईन करण्यात आले आहे.  तसेच त्या कोणाकोणाचे संपर्कात आल्या त्याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू झालेले आहे. त्याठिकाणी प्रभारी सरपंच असलेले गणेश जावळेकर यांनी आपला  भाऊ असल्या कारणाने जे बेजबाबदारपणाचे वर्तन दाखवले आहे. त्यासाठी त्यांचे सरपंचपद रद्द करण्यात यावे त्याचप्रमाणे त्यांच्यावरती आपत्ती व्यवस्थापन धोरणाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी परिसरातून करण्यात येत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील हा प्रकार पूर्णपणे प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. तरी राज्याचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन ज्या अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात बेजबाबदारपणा दाखवला आहे अशांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.