श्रीवर्धनमधील बाजारपेठ ३ मे पर्यंत बंद ठेवण्याचा व्यापारी संघटनेचा निर्णय, व्हॉट्स अॅपवर ऑर्डर घेऊन घरी देणार सामान

श्रीवर्धन : रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढली असून श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावातील कोरोना रुग्णांची संख्या ५ वर पोहोचली आहे. त्या कोरोना रूग्णांच्या संपर्कात आलेल्या ९ व्यक्तींचा

 श्रीवर्धन : रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढली असून श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावातील कोरोना रुग्णांची संख्या ५ वर पोहोचली आहे. त्या कोरोना रूग्णांच्या संपर्कात आलेल्या ९ व्यक्तींचा रिपोर्ट अजून येणे बाकी आहे. त्यामुळे त्या संपर्कात आलेल्या रुग्णाचा रिपोर्ट नेमका काय येतो याकडे संपुर्ण श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. श्रीवर्धन तालुक्यातील जनता भयभीत झालेली आहे. कारण छुप्या पध्दतीने श्रीवर्धन तालुक्यात मुंबई व पुणे या ठिकाणाहून शेकडोच्या घरात चाकरमान्यांचे आगमन झाले आहे. एकट्या श्रीवर्धन तालुक्यात सुमारे ७ हजार पेक्षा जास्त नागरिकांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याच्यावर प्रशासनाने लक्षसुध्दा ठेवले आहे. मात्र काही नागरिकांना या महाभयंकर कोरोनाचे गांभीर्य अजून समजलेले नाही. त्यामुळे काही नागरिक प्रशासनाचे लक्ष चुकवून फिरताना दिसतात. प्रशासन सुध्दा अशा लोकांपुढे हतबल झालेले दिसत आहे.त्यामुळे श्रीवर्धन शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीकोनातून व्यापारी संघटना श्रीवर्धन यांच्या वतीने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. २४ एप्रिलपासून ३ मे पर्यंत( लाॅकडाऊन असेपर्यंत) श्रीवर्धन शहरातील मेडिकलची दुकाने सोडून सर्व किराणा मालाची दुकाने पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत असे ठरविण्यात आले आहे. 

ग्राहकांना  लागणारे अत्यावश्यक साहित्य, सामुग्रीची यादी बनवून श्रीवर्धन शहरातील व्यापारी बांधवांना व्हाॅटसअॅप द्वारे पाठवून द्यावे. त्याना घरपोच साहित्य सामुग्री देण्यात येईल. दुकानापर्यंत येण्याची आता गरज लागणार नाही. असे व्यापारी संघटना श्रीवर्धन यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. हा घेण्यात आलेला निर्णय ग्राहक व दुकानदारांच्या आरोग्याच्या दृष्टीने उत्तम निर्णय घेतला गेला आहे. श्रीवर्धन तालुक्यातील प्रशासनाने तसेच किराणा मालाचे दुकानदार व भाजी  विक्रेते यांनी घेतला आहे. श्रीवर्धन शहरामध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे, श्रीवर्धनमधील भोस्ते गाव सील केले असुन त्या परिसरात ५ किलोमीटरपर्यंत पोलीस पहारा ठेवण्यात आला आहे.