भोस्ते गावातील कोरोनाबाधिताची टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे श्रीवर्धन तालुका कोरोनामुक्त, गावातील सील काढण्याची मागणी

श्रीवर्धन:श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावामध्ये १८ एप्रिल रोजी कोरोना रुग्ण सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. प्रशासनाने संपूर्ण भोस्ते गाव तात्काळ सील करून सदर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २८

श्रीवर्धन: श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावामध्ये १८ एप्रिल रोजी कोरोना रुग्ण सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. प्रशासनाने संपूर्ण भोस्ते गाव तात्काळ सील करून सदर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २८ जणांना कोरोनाच्या टेस्टसाठी पनवेल येथे पाठवण्यात आले होते. मात्र २८ जणांची टेस्ट झाल्यानंतर त्यामध्ये चार रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर उर्वरित सर्व जण कोरोना निगेटिव्ह आढळून आले. या चार व्यक्तींमध्ये कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीची पत्नी व तीन मुले होती. मात्र या कुटुंबातील तीन मुले एका आठवड्यातच कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांचे गावामध्येच विलगीकरण करण्यात आले होते. तर आठ दिवसांपूर्वी सदर कोरोनाबाधित व्यक्तीची पत्नीदेखील निगेटिव्ह आल्यामुळे तिचे देखील गावामध्ये विलगीकरण करण्यात आले होते. १८ एप्रिल रोजी सील झालेले भोस्ते गाव अद्यापही सील न काढण्यात आल्यामुळे प्रचंड तणावाखाली असल्याचे पाहायला मिळत आहे  ३ मे रोजी संपणारा लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढविण्यात आल्यानंतर प्रशासनाकडून अनेक गोष्टींमध्ये सूट देण्यात आली आहे. मुंबईतून अनेक चाकरमानी गावाकडे श्रीवर्धन तालुक्यात आलेले आहेत. परंतु हा चाकरमानी विलगीकरणात न राहता बिनधास्तपणे सर्वत्र फिरताना दिसत आहेत. त्यामुळे तालुक्यासह शहरामध्ये भीतीचे वातावरण आहे.

दोन दिवसांपूर्वी भोस्ते गावातील पहिला आढळून आलेला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण त्याची टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्याला पुन्हा भोस्ते गावात आणण्यात आले आहे. गावामध्ये असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये या रुग्णाला विलगीकरण करुन ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे श्रीवर्धन तालुका आता कोरोनामुक्त झाला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परंतु गावाकडे परतलेल्या चाकरमान्यांनीदेखील स्वतः वर आवर घालण्याची गरज आहे. श्रीवर्धन शहरातील मुळगाव कोळीवाडा परिसरात मुंबईतून जवळजवळ दोनशे ते अडीचशे चाकरमानी परत आले आहेत. सदर मुंबईकरांना दिवसा फिरता येत नसल्यामुळे रात्री दहा वाजल्यानंतर हे चाकरमानी श्रीवर्धन चौकर पखाडी या परिसरात बिनबोभाटपणे कोणताही सोशल डिस्टन्सचा नियम न पाळता फिरताना दिसून येतात. तरी पोलीस प्रशासनाने या फिरणाऱ्या चाकरमान्यांना समज देण्याची आवश्यकता आहे. भोस्ते गावदेखील कोरोना मुक्त झाल्यामुळे त्या ठिकाणचे सील लवकरात लवकर काढण्यात यावे, अशी त्या ठिकाणच्या नागरिकांची मागणी आहे.