श्रीवर्धन शहरातील कचरा वेळेवर न उचलला गेल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव, साथींचे वाढतेय प्रमाण

श्रीवर्धन :निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा श्रीवर्धन शहराला जोरदार बसल्यानंतर असंख्य नारळ-सुपारी त्याचप्रमाणे आंबा, फणस,कोकम,चिकु यांची झाडे उन्मळून पडली होती. परिणामी शहरातील नागरिकांनी झाडांची साफसफाई

श्रीवर्धन :निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा श्रीवर्धन शहराला जोरदार बसल्यानंतर असंख्य नारळ-सुपारी त्याचप्रमाणे आंबा, फणस,कोकम,चिकु यांची झाडे उन्मळून पडली होती. परिणामी शहरातील नागरिकांनी झाडांची साफसफाई करून कचरा रस्त्यावर आणून टाकला होता. तर अनेकांची झाडे कुंपणाजवळ असल्याने ती पडून गेल्यानंतर रस्त्यामध्ये पडली होती. मात्र चक्रीवादळ होऊन गेल्यानंतर एक महिना होत आला तरी श्रीवर्धन शहरातील अनेक भागातील कचरा किंवा झाडांचा पालापाचोळा अद्याप उचलण्यात आलेला नाही. हा कचरा हा गटारांमध्येदेखील असल्याने पाऊस पडल्यानंतर गटारांमध्ये पाणी तुंबून राहते. त्यामुळे सध्या विचित्र प्रकारच्या डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला पाहायला मिळत आहे. या डासांवर पांढऱ्या रंगाचे ठिपके असून चावल्यानंतर त्या ठिकाणी दाद उठते. अशा प्रकारचे डास वारंवार चावल्यामुळे श्रीवर्धन शहरामध्ये तापाची साथ पसरलेली आहे.

श्रीवर्धन शहरातील डॉक्टरांनादेखील कोरोना लागण झाल्याची घटना समोर आल्यानंतर तापाच्या साथीमुळे अनेक नागरिक भयभीत झाल्याचे पहायला मिळत आहेत. मात्र नगर परिषद प्रशासनाकडून कचरा उचलण्यासाठी कोणत्याही प्रकारचे युद्ध पातळीवर प्रयत्न होताना दिसत नाहीत. डास निर्माण होऊ नये म्हणून जुने झालेले टायर, रिकामे पत्र्याचे डबे, करवंट्या, इत्यादी नष्ट करणे आवश्यक आहे. याबाबत श्रीवर्धन नगर परिषदेच्या घंटागाडी वरून कोणत्याही प्रकारची उद्घोषणा करताना दिसत नाही. दिवसातून दोन वेळा कचरा उचलण्यासाठी येणाऱ्या घंटा गाड्यांवर फक्त कोरोना आणि चक्रीवादळा नंतर निर्माण झालेला कचरा टाकु नये तेवढ्याच उद्घोषणा होताना दिसतात. ज्या नागरिकांच्या आवारामध्ये झाडाझुडपांचा कचरा प्रचंड प्रमाणात आहेत. त्यांनी तो टाकायचा कुठे हा प्रश्नदेखील महत्त्वाचा आहे. कारण पावसाळा असल्यामुळे जमिनीमध्ये खड्डा खोदून तो गाडून टाकणे शक्य नाही. तरी श्रीवर्धन नगर परिषदेने संपूर्ण शहरांमध्ये धुराची फवारणी त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी डास निर्माण होतील, अशा ठिकाणी कीटकनाशकाचा वापर करून डासांचा प्रादुर्भाव कमी करण्याची आवश्यकता आहे.