श्रीवर्धन तालुक्यात पावसाळ्यापूर्वीच्या शेतीच्या मशागतीच्या कामांना सुरुवात

श्रीवर्धन : मौसमी पाऊस येत्या पंधरा ते वीस दिवसात सुरू होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे देशावर जरी कोरोना महामारीचे संकट असले तरीसुद्धा शेतकऱ्यांना शेती करावी

 श्रीवर्धन : मौसमी पाऊस येत्या पंधरा ते वीस दिवसात सुरू होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे देशावर जरी कोरोना महामारीचे संकट असले तरीसुद्धा शेतकऱ्यांना शेती करावी लागणार आहे व अन्नधान्य हे पीकवावेच लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाळ्या अगोदर करावी लागणारी शेतीच्या मशागतीची कामे करण्याकडे जास्त लक्ष दिल्याचे दिसून येत आहे. श्रीवर्धन तालुक्यात पावसाळ्यात प्रामुख्याने भात शेतीचे उत्पन्न घेतले जाते. मात्र तालुक्यातील अनेक गावेच्या गावे नोकरीधंदा निमित्त मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरांमध्ये गेल्याने गावी शेती ओसाड टाकण्यात आलेली संख्या जवळजवळ ८० टक्के आहे. मात्र जे शेतकरी या ठिकाणी शेती करतात त्यांनी आता मशागतीच्या कामांना जोरदारपणे सुरुवात केली आहे. आता जे चाकरमानी मुंबईहून परत आलेत  त्यांना परत आपल्या नोकरीधंद्यासाठी केव्हा जावे लागेल, त्याची शाश्वती नाही. त्यामुळे आता ते देखील शेती करतील, अशी आशा निर्माण झाली आहे. भात लावणीच्या अगोदर भात ज्या ठिकाणी एकत्र उगविले जाते त्याला दाढ असे म्हणतात. त्यासाठी एक विशिष्ट चौकोनी आकाराचे किंवा आयताकृती आकाराचे क्षेत्र निवडले जाते. त्यावरती सुकलेले शेण, पालापाचोळा त्याचप्रमाणे झाडांच्या सुकलेल्या फांद्या इत्यादी टाकून हे सर्व त्या ठिकाणावर जाळण्यात येते, व पाऊस सुरू झाल्यानंतर तेवढाच भाग नांगरणी करून त्यामध्ये भात बियाणे पेरले जाते. त्यामुळे भाताची रोपे चांगली व पोषक वाढतात. मुंबईहून परत आलेल्या चाकरमान्यांनी गावी शेती करण्याचे ठरवले तर शासनाकडून देखील त्यांना बी बियाणे पुरवणे आवश्यक आहे. कारण मुंबईत कोरोनाची परिस्थिती पाहता बहुसंख्य चाकरमान्यांनी गावाला येऊन राहणेच पसंत केल्याचे दिसत आहे. एकूणच शेतकऱ्यांची मशागतीच्या कामासाठी लगबग सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.