मच्छिमार आर्थिक संकटात, तटकरे मदत करतील अशी अपेक्षा

श्रीवर्धन :जुन व जुलै २०१९ हे दोन महिने पावसाळी मासेमारी बंद होती. हा कालावधी संपल्यानंतर १ ऑगस्ट २०१९ पासून मासेमारी हंगाम सुरू झाला. मात्रसतत होणारी वादळे व अतिवृष्टीमुळे पुर्ण

 श्रीवर्धन : जुन व जुलै २०१९ हे दोन महिने पावसाळी मासेमारी बंद होती. हा कालावधी संपल्यानंतर १ ऑगस्ट २०१९  पासून मासेमारी हंगाम सुरू झाला. मात्रसतत होणारी वादळे व अतिवृष्टीमुळे पुर्ण मच्छीमारी हंगाम १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत वाया गेला आहे. त्याबाबत  मच्छिमारांना नुकसान भरपाई काहीच मिळली नाही. ( शेतकरी बांधवाना कर्जमाफी सह नुकसान भरपाई मिळाली.)  मत्स्यव्यवसाय खात्यानी वेळोवेळी मच्छीमार सहकारी संस्थाकडून माहिती घेतली होती. विधान परिषदेच्या सभागृहात प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चार महिन्यानंतर दुष्काळाबाबत निर्णय घेण्याची घोषणा केली गेली. मुख्य मच्छीमारी हंगामा वाया गेल्या नंतर लगेच मोठ्या प्रमाणावर मंदी आली.त्यामध्ये डिझेल प्रतिपुरती पोटी मच्छिमारांना रूपये १८७ कोटी पैकी रूपये ७८ कोटी रिलीज केल्याचे सागिंतले.  परंतु त्यापैकी  जिल्ह्यातील किती मच्छीमार संस्थांना मत्स्य व्यवसाय खात्याने परतावा वाटप केला आहे, हा प्रश्न आहे. होळीनंतर  मासेमारी सुरु होण्याच्या आशेवर जगणारा मच्छिमार महामारी कोरोनाचे संकट डोक्यावर झेलत कसाबसा जगत आहे.फक्त आत्महत्या करणे बाकी आहे. पुढील महिन्यामध्ये  मासेमारी बंद होईल. त्यामध्ये खलाशी मेहनताना व पावसाळ्यामध्ये तीन महिने घर बसल्या मच्छिमारांनी संसार चालवायचे कसे ? या चिंतेत मच्छीमार आहे.

आधीच तीन महिने छोट्या मोठ्या समुद्री वादळामुळे मच्छिमारांनाचे कंबरडे मोडलेले आहे. याआधी शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करून मच्छीमार समुद्रात मासेमारीसाठी जात नव्हते. सरतेशेवटी आपल्या जीवाची पर्वा न करता नौकामध्ये डिझेल, पाणी, लागणारे अत्यावश्यक साहित्य सामुग्री तसेच ऑईल, व इतर वस्तू घेऊन खोल समुद्रात मासेमारीसाठी जात होते.  परंतु खोल समुद्रात जाऊन सुध्दा मासे मिळत नसल्याने मच्छीमाराला निराश होऊन खाली हाताने परत यावे लागत  होते. आज नाही तर उद्या मासे मिळतील या आशेपोटी पुन्हा कर्ज काढून पुन्हा नौकाना लागणारे साहित्य सामुग्री घेऊन खोल समुद्रात मासेमारीसाठी जात होते. परंतु पुन्हा पुन्हा तीच परिस्थिती नौका मालकांना अनुभवास येत आहे. त्यामुळे मच्छीमार बांधव आता उध्दवस्त झाला आहे. याकडे शासन गांभीर्यने दखल घेताना दिसत नाही. सध्या तर २२ मार्च पासून ३ मे पर्यंत लाॅकडाऊन असल्याने सगळा व्यवहार ठप्प झाला आहे. काही दिवसांनी मच्छिमारांना सवलत दिली खरी पण त्याचा उपयोग पुरेशा प्रमाणात होताना दिसत नाही. एकतर खोल समुद्रात जाऊन पुरेसे मासे मिळत नाहीत. नौकांना होणार खर्च सुटत नाही . शिवाय आणलेले कमी मासे कोरोनाच्या संकटामुळे बाजारात विक्री करण्यासाठी विक्रेते धजावत नव्हते .आज फार वाईट परिस्थितीला मच्छिमारांना सामोरे जावे लागत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील दिघी, आदगाव, कुडगाव, दिवेआगर, भरडखोल, जीवना बंदर, मुळगाव कोळी वाडा, बागमांडला या ठिकाणच्या मच्छिमारांनी आपल्या नौका किनाऱ्यावर खेचण्यास सुरूवात केली आहे.रायगड जिल्ह्यातील खासदार सुनिल तटकरे, मंत्री व रायगड जिल्ह्याच्या पालक मंत्री आदिती तटकरे  व आमदार अनिकेत तटकरे हे रायगड जिल्ह्यातील आहेत. त्यानी यामध्ये लक्ष घालून मच्छिमारांना मदतीचा हात देण्यासाठी पॅकेज जाहीर करावे,अशी अपेक्षा मच्छिमारांन कडून व्यक्त केली जात आहे.