श्रीवर्धन तालुक्यात चाकरमान्यांचा ओघ सुरूच – विलगीकरण केलेले देखील बाहेर फिरत असल्याने भीतीचे वातावरण

श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यातील जवळजवळ ७० टक्के नागरिक नोकरी धंद्यानिमित्त विविध शहरांमध्ये राहतात. यातील सर्वाधिक चाकरमानी मुंबई, नालासोपारा, विरार त्याचप्रमाणे ठाणे, कल्याण, डोंबिवली व पुणे या

श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यातील जवळजवळ ७० टक्के नागरिक नोकरी धंद्यानिमित्त विविध शहरांमध्ये राहतात. यातील सर्वाधिक चाकरमानी मुंबई, नालासोपारा, विरार त्याचप्रमाणे ठाणे, कल्याण, डोंबिवली व पुणे या ठिकाणी नोकरी-धंद्यानिमित्त वास्तव्यास आहेत. सध्या मुंबई शहराच्या आजूबाजूच्या ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरात देखील कोरोनाने थैमान मांडले आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दररोज दीड हजाराच्या वर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. अशातच ज्या चाकरमान्यांना गावी जायचे आहे त्यांना गावी जाण्यासाठी शासनाने परवानगी दिल्यामुळे कोरोनाने आता आपले पाय कोकणातदेखील घट्ट रोवायला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे गोवा येथेदेखील कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडू लागले आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर चाकरमानी येऊ लागले आहेत. येणारे मुंबईकर काही जण स्वतःहून हॉस्पिटलमध्ये जाऊन होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घेत आहेत. तर काहीजण प्रशासनाला कोणतीही कल्पना न देता थेट आपल्या घरी पोहोचत आहेत. प्रशासनाकडून अशा थेट घरी जाणाऱ्या नागरिकांना शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून अशा आलेल्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना देखील विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. मात्र विलगीकरण करुन ठेवलेले अनेक नागरिक खुलेआमपणे रस्त्यावर किंवा बाहेर फिरताना दिसून येत असल्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कारण दोन दिवसांपूर्वी श्रीवर्धन तालुक्यातील दिघी, वडवली व खुजारे या तीन गावांमध्ये एक एक कोरोना रुग्ण आढळुन आला आहे. यापैकी दोघांचा मृत्यू झाला होता तर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर स्वॅब घेऊन तपासणी केली असता ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. आता या मृत व्यक्तींच्या व पॉझिटिव्ह असलेल्या एका मुलीच्या संपर्कात असलेल्यांना कोरोना चाचणीसाठी नेण्यात आले आहे. तरी श्रीवर्धन तालुका प्रशासनाने त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाने होमक्वारंटाईनचे शिक्के असलेले नागरिक मोकळे फिरताना आढळत असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.