लॉकडाऊनमुळे श्रीवर्धन तालुक्यात अनेक ठिकाणी घरांची कामे अर्धवट, पावसाळा सुरु झाला तर निवाऱ्याचा प्रश्न गंभीर

श्रीवर्धन: पावसाळा संपल्यानंतर शेतीची कामे आटोपली की नागरिक आपली जुनी झालेली घरे बांधण्यासाठी काढतात. अनेक खेडेगावांमध्ये तसेच श्रीवर्धन शहरात देखील अनेक नागरिकांनी आपल्या घरांचे बांधकाम सुरू केले

श्रीवर्धन: पावसाळा संपल्यानंतर शेतीची कामे आटोपली की नागरिक आपली जुनी झालेली घरे बांधण्यासाठी काढतात. अनेक खेडेगावांमध्ये तसेच श्रीवर्धन शहरात देखील अनेक नागरिकांनी आपल्या घरांचे बांधकाम सुरू केले होते. यावर्षी पावसाळा लांबल्याने जवळजवळ डिसेंबरपर्यंत पाऊस पडत होता. त्यामुळे जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान नागरिकांनी घरांची बांधकामे सुरू केली. जुने घर पाडल्यानंतर त्या ठिकाणचा मलबा उचलून नवीन पिलर, फुटींग करेपर्यंत महिन्याचा कालावधी जातो. त्यानंतर स्लॅब टाकून उर्वरित कामे केली जातात. परंतु मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे अनेक नागरिकांची घर बांधण्याची कामे रखडून राहिली आहेत. एका गावातून दुसऱ्या गावात जाता येत नसल्यामुळे काम करणारे गवंडी, मजूर इत्यादींची कमतरता आहेच. परंतु पावसाळा एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. जर का पाऊस बरोबर जूनच्या दहा तारखेला सुरू झाला तर नागरिकांनी राहायचे कोठे? कारण ज्यांनी आपले घर बांधायला काढले आहे असे अनेक जण छोट्या खोपटा मध्ये किंवा झोपडे बांधून त्यामध्ये राहत असतात. परंतु पावसाळ्यात कोकणात पाऊस जास्त पडत असल्यामुळे पक्के घर असणे आवश्यकच आहे. तरी शासनाने तीन मे नंतर ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण नाहीत, अशा ठिकाणचा लॉकडाऊन शिथिल करून राहिलेली घरांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी नागरिकांना मदत करावी,अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.