श्रीवर्धन तालुक्यात कोरोनाबाधित सापडल्यानंतर नागरिकांनी घरातच राहणे केले पसंत

श्रीवर्धन:श्रीवर्धन शहरापासून अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या भोस्ते गावामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर त्याच्या संपर्कात असलेल्या २८ जणांना तपासणीसाठी पनवेल येथे नेण्यात

 श्रीवर्धन: श्रीवर्धन शहरापासून अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या भोस्ते गावामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर त्याच्या संपर्कात असलेल्या २८ जणांना तपासणीसाठी पनवेल येथे नेण्यात आले होते. त्यामध्ये बाधित रुग्णाची पत्नी व तिन्ही मुलेदेखील कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.तर २४ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. या घटनेमुळे श्रीवर्धन तालुक्यात घबराटीचे वातावरण आहे. नागरिकांनी स्वतःहून स्वतःलाच लॉकडाऊन करून घेतल्याचे पाहायला मिळत आहे. कालपासून भोस्ते व आजूबाजूचा परिसर सील करण्यात आला असून पोलीस बंदोबस्तात याठिकाणी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे श्रीवर्धन शहरातील पोलीस बंदोबस्त कमी करण्यात आलेला आहे. श्रीवर्धन शहरातील शिवाजी चौकात १ पोलीस व  प्रवेशद्वारावर ३ पोलीस तेवढेच पोलीस रस्त्यावर दिसत होते. परंतु शहरात पोलीस नसतानासुद्धा नागरिकांनी उत्स्फूर्तपणे लॉकडाऊनमध्ये सहभाग घेतलेला आहे. रस्त्यावर कोणीही फिरताना दिसत नाही. फक्त औषधाची दुकाने व दवाखाने उघडे असलेले पाहायला मिळत होते. बाकी सर्व व्यवहार बंद होते. हा कोरोनाबाधित रुग्ण हा मुंबईतील वरळी येथे राहणारा होता. ज्यावेळेस श्रीवर्धन येथे आला त्यावेळेला वरळी कोरोनाचा हॉटस्पॉट झालेला होता. मात्र हा रुग्ण आपल्या कुटुंबासह श्रीवर्धनपर्यंत पोहोचलाच कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच भोस्ते ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा  हा रुग्ण सख्खा भाऊ आहे. तरी भोस्ते ग्रामपंचायतीच्या सरपंचांवर देखील आपत्ती व्यवस्थापन व महामारी कायद्याच्या अधीन राहुन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे.