श्रीवर्धन- दिवेआगार मार्गावर मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची वाढतेय गर्दी

श्रीवर्धन:श्रीवर्धनपासून काही अंतरावर असलेली मोठी शहरे मुंबई, पुणे या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण भारतातील राज्यांमध्ये महाराष्ट्र कोरोना

 श्रीवर्धन: श्रीवर्धनपासून काही अंतरावर असलेली मोठी शहरे मुंबई, पुणे या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण भारतातील राज्यांमध्ये महाराष्ट्र कोरोना बाधितांमध्ये क्रमांक एक वर आहे. श्रीवर्धन तालुक्यात देखील पाच कोरोना बाधित रुग्ण सापडले होते. पैकी तीन रुग्ण बरे होऊन परत आले आहेत. परंतु काही नागरिक लॉकडाऊनचा अर्थ गांभीर्याने घेत नसल्यामुळे फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. विशेष करून सकाळच्या मॉर्निंग वॊकच्या नावाखाली श्रीवर्धन दिवेआगर मार्गावरती श्रीवर्धन ते वाळवटी दरम्यान मॉर्निंग वॉक करणारे घोळके च्या घोळके दिसून येत आहेत. विशेष बाब म्हणजे मॉर्निंग वॊक करत असताना नागरिकांकडून सोशल डिस्टन्सचे पालन अजिबात होताना दिसत नाही. मॉर्निंग वॉक करणाऱ्यांमध्ये काही सुशिक्षित नागरिक देखील आहेत, की जे उच्चशिक्षित आहेत. एक महिना मॉर्निंग वॉक केले नाही तर आपले वजन काही २५ किलो वाढणार नाही. मात्र बाहेर पडण्याचा कोणता तरी बहाणा करून फेरफटका मारायचा उद्देशाने मॉर्निंग वॊक करण्याचे प्रकार सुरू आहेत. श्रीवर्धन गाय गोठण ते वाळवटी गाव या दरम्यान फिरणारे नागरिक मोठ्या प्रमाणात दिसून येतात. तसेच मागील आठ दिवसांपासून श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर देखील मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसुन येत आहे. तसेच मॉर्निंग वॉक करणारे कोणतीही सुरक्षा साधने वापरताना देखील दिसून येत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर मास्कदेखील लावलेला नसतो. तसेच काही नागरिक श्रीवर्धन नगरपालिकेच्या मागे असलेल्या डोंगरावरती एक दर्गा आहे त्या ठिकाणी डोंगर चढण्यासाठी देखील जाताना दिसून येतात. काही जण आपण पिकनिकला चाललोय अशा प्रकारे गप्पा गोष्टी करत चालत असतात.मुंबई, नवी मुंबई, पनवेल या ठिकाणी मॉर्निंग वॊक करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. सदर कारवाईच्या बातम्या पाहून सुद्धा श्रीवर्धन मधील नागरिक मोठ्या प्रमाणावर मॉर्निंग वॉकसाठी का बाहेर पडतात हा औत्सुक्याचा विषय आहे. तरी अशाप्रकारे मॉर्निंग वॊक करणाऱ्यांवर श्रीवर्धन पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी समस्त नागरिकांमधून केली जात आहे.