चक्रीवादळामुळे श्रीवर्धन शहरात पडलेल्या झाडांच्या फांद्या व पालापाचोळा त्वरित न उचलल्यास दुर्गंधी पसरण्याची शक्यता

श्रीवर्धन: निसर्ग चक्रीवादळाच्या प्रकोपामुळे श्रीवर्धन शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली तर अनेक झाडांच्या फांद्या मोडून खाली पडल्या .पालापाचोळादेखील मोठ्या प्रमाणावर पडलेला आहे. नागरिकांच्या

 श्रीवर्धन: निसर्ग चक्रीवादळाच्या प्रकोपामुळे श्रीवर्धन शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली तर अनेक झाडांच्या फांद्या मोडून खाली पडल्या .पालापाचोळादेखील मोठ्या प्रमाणावर पडलेला आहे. नागरिकांच्या वाड्यांमध्ये पडलेली झाडे व कचरा उचलण्यास नागरिकांनी सुरुवात केली आहे. त्यांच्या मदतीसाठी आणि झाडे कापण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथकदेखील श्रीवर्धनमध्ये रवाना झाले आहे. मात्र शहरातील रस्त्यांवर जागोजागी झाडाच्या फांद्या, माडाचे झाप,सुपारीच्या झावळ्या व पालापाचोळा गटारांमध्ये पडून आहे. दोन दिवसांपासून मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. पाऊस चांगल्या प्रमाणात पडत आहे. सध्या माती कोरडी असल्यामुळे पाणी मातीमध्ये जिरत आहे. मात्र पंधरा दिवसानंतर हेच पाणी मोठ्या प्रमाणावर तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संपूर्ण श्रीवर्धन शहरातील प्रत्येक रस्त्यावर हीच परिस्थिती आहे. श्रीवर्धन नगर परिषदेने अतिरिक्त कर्मचारी लावून सदरचा कचरा तातडीने उचलावा अन्यथा दुर्गंधी पसरून विविध आजार देखील पसरल्याशिवाय राहणार नाहीत. श्रीवर्धन नगर परिषदेने सध्या कचरा उचलण्यासाठी लावलेला कर्मचारीवर्ग कमी पडत आहे. तरी नगर परिषद प्रशासनाने खाजगी वाहने व अतिरिक्त कर्मचारी कामासाठी घेऊन शहर लवकरात लवकर स्वच्छ करावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.