श्रीवर्धन शहरात नव्याने सापडले सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

श्रीवर्धन : श्रीवर्धन शहरातील लॉकडाऊन २४जुलैपासून पूर्णपणे उठवण्यात आला आहे. सर्व प्रकारची दुकाने त्याचप्रमाणे रिक्षा, सहाआसनी रिक्षा व शासकीय कार्यालये नियमितपणे सुरू आहेत. परंतु आज श्रीवर्धन शहरात कोरोनाचे सहा नवीन रुग्ण आढळून आले आहेत. मात्र शहर सोडून तालुक्यातील ग्रामीण भागातून एकही रुग्ण आज सापडलेला नाही. श्रीवर्धन शहरातील पेशवे आळी परिसरातील एक ४७ वर्षांची स्त्री व ३१ वर्षाचा पुरुष पॉझिटिव आढळून आला आहे. तर केळस्कर पाखाडी परिसरात एक ६९ वर्षांची महिला व अडतीस वर्षांची महिला पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. तसेच श्रीवर्धन नारायण पाखाडी येथे २९ वर्षाचा पुरुष २९ वर्षाची महिला पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. तालुक्यात आज तीन रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत तालुक्यात १५० कोरोना बाधित आढळून आले. पैकी ११२ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेलेले आहेत, तर सहा जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. ३२ कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत असून यामध्ये काही जण इस्पितळांमध्ये दाखल आहेत, तर काही जण होम आयसोलेशन मध्ये उपचार घेत आहेत. ह्यात सर्वात जमेची बाजू म्हणजे १५० आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ११२ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. परंतु आता गौरी गणपतीच्या सणाला मुबंईहून चाकरमानी गावाकडे दाखल होणार आहेत. त्यावेळी जर का रुग्ण संख्या वाढली तर थोडेसे चिंतेचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.