कोरोना योद्धे आणि गरिबांना सोशल स्पार्कच्या मास्कचा आधार

पनवेल : समाजातील कष्टकरी गरीब व्यक्तींच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहिला की मनाला समाधान मिळते. ज्या समाजात आपण राहातो त्याचे आपण काही तरी देणे लागतो याची जाणीव ठेऊन त्यांना मास्क वाटप करून आम्ही '

पनवेल : समाजातील कष्टकरी गरीब व्यक्तींच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहिला की मनाला समाधान मिळते. ज्या समाजात आपण राहातो त्याचे आपण काही तरी देणे लागतो याची जाणीव ठेऊन त्यांना मास्क वाटप करून आम्ही ‘ सोशल स्पार्क ‘च्या  माध्यमातून खारीचा वाटा उचलत असल्याचे ग्रुपच्या प्रमुख सुषमा गुप्ता यांनी सांगितले. आज या ग्रुपमध्ये मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि कर्नाटक राज्यातील महिला ही सहभागी होऊन कोरोनाविरुध्द लढण्यासाठी आपले योगदान देत आहेत                

 कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे बनल्यावर मास्कची मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाली. बाजारात मास्कच्या किमती सर्वसामान्यांना परवडणार नाहीत एवढ्या वाढल्या. त्यामुळे गरीब सर्वसामान्य नागरिक मास्क न वापरताच घराबाहेर पडताना दिसत होते. त्यांना मास्क वापरायला सांगून उपयोग नव्हता. त्यामुळे त्यांना मास्क कसे उपलब्ध करून देता येतील या विचारातून नवीन पनवेलमधील सुषमा गुप्ता यांनी   सुरूवातीला सोसायटीतील महिलांच्या मदतीने मास्क बनवायला सुरुवात करून ते गरीब विक्रेते , वॉचमन , घरकामगार आणि सफाई कामगार यांना द्यायला सुरुवात केली. एका महिलेपासून स्फूर्ती घेऊन दुसरी महिला काम करू लागली. अशा प्रकारे एक ग्रुप तयार झाला. श्रध्दा पटेल , शशि शर्मा , किर्ती पोतदार , भावना सूचक , आनंदी सिंग , सरोज पाटील , गंगा बनेटी , सविता पाटील , रेखा मिश्रा , पुष्पा मेहता , सीमा शर्मा आणि नगरसेविका निर्मला म्हात्रे असा जवळपास ६० ते ७० जणींचा ग्रुप झाला आहे.  त्यामध्ये इतर  राज्यातील त्यांचे नातेवाईक आणि मित्र मंडळी ही सहभागी झाली त्यातून ‘ सोशल स्पार्क ‘ चा जन्म झाला. यासाठी नेटवर्क मार्केटिंगमधील अनुभवाचाही त्यांना फायदा झाला      
     विशेष म्हणजे मास्क बनवण्यासाठी येणारा खर्च हे सर्वजण स्वतःकरीत आहेत. आजपर्यंत या सर्वांनी मिळून हजारो मास्क तयार केले . हे मास्क  विविध सामाजिक आणि  सेवाभावी संस्था, रुग्णालये,  तसेच मोलमजुरी करणाऱ्या मजुरांना आणि बेघरांना मोफत वाटले आहेत. भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हे प्रत्यक्षात आणून  कोरोंनामध्ये दीन दुबळ्यांसाठी काही तरी करायचे या भावनेने तयार झालेल्या ‘ सोशल स्पार्क ‘ या ग्रुपमधील विविध प्रांतातील भगिनींनी आपले घर सांभाळून कोरोना योध्दे आणि दीनदुबळ्यांना मास्क पुरवून एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे असे म्हणाला हरकत नाही.त्यांच्याकडे अनेक सामाजिक संस्था मास्कची मागणी करीत आहेत. निसर्ग वादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोकणवासीयांसाठी ही त्यांचे आता मास्क तयार करण्याचे काम सुरू आहे.