कोरोना योध्द्यांच्या सेवेत असणारे एस.टी कर्मचारी २ महीने पगारापासून वंचित

पनवेल : मुंबईत कोरोना योध्द्यांची वाहतूक करणार्‍या पनवेल आगारातील चालक आणि वाहकांचा एप्रिल महिन्यापासूनचा पगार देण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेकांच्या खिशात घरून येण्यासाठीही पैसे नसल्याने

पनवेल : मुंबईत कोरोना योध्द्यांची वाहतूक करणार्‍या पनवेल आगारातील चालक आणि वाहकांचा एप्रिल महिन्यापासूनचा पगार  देण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेकांच्या खिशात घरून येण्यासाठीही पैसे नसल्याने कर्मचार्‍यांत असंतोष निर्माण झाला आहे. राज्यातील एस.टीच्या  इतर विभागातील कर्मचार्‍यांचे आणि अधिकार्‍यांचे पगार  मात्र शासनाने दिलेल्या निधीतून करण्यात आल्याची माहिती कामगार संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिली. 

शासनाने २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केल्यावर अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना कामाच्या ठिकाणी नेण्यासाठी एस.टी सेवासुरू ठेवण्यात आली. पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात मुंबईला अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी राहत असल्याने पनवेल आगारातून मुंबईतील हॉस्पिटल,पोलीस आणि इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी रोज १५० पेक्षा जास्त फेर्‍या चालवल्या जातात. पनवेल आगारातील चालक – वाहक काम करीत असतानाही त्यांना मार्च महिन्यात ७५ टक्के पगार देण्यात आला तर एप्रिल महिन्यापासून पगारच देण्यात आलेला नाही.  राज्यात एसटीच्या इतर विभागात कोणतीही फेरी सुरू नसताना कर्मचार्‍यांना पगार देण्यात आला. मध्यवर्ती आणि विभागीय कार्यालयातील कर्मचार्‍यांना शासनाने दिलेल्या निधीमधून पगार दिला गेला पण आपला जीव धोक्यात घालून काम करणार्‍यांना मात्र पगार देण्यात आलेला नाही. उलट कामावर हजर असलेल्या कामगाराला पगार द्यायला नको म्हणून ड्यूटी नसल्यास रजेचा अर्ज द्यायला लावून त्याची रजा बिनपगारी केली जात आहे. त्यामुळे पनवेल आगारातील चालक आणि वाहकांच्यात असंतोष निर्माण झाला आहे.