dogs bite in mahad

पिसाळलेल्या कुत्र्यांनी माणसांना चावे घेण्याचे प्रकारही सातत्याने घडत असतात. काही दिवसांपूर्वी शहरातील वीरेश्वर मंदिर परिसरात एका लहान मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. सुदैवाने तेथे असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत या मुलाची कुत्र्यांच्या झुंडी पासून सुटका केली. तर काल परांजपे शाळे समोर साहिल संदीप पानवकर या मुलाला बाईक वरून जाताना कुत्र्याने हल्ला करत पायाला चावा घेतला.

महाड : भटक्या कुत्र्यांनी महाडकर (Stray dogs) नागरिकांना (Citizens) चांगलेच वेठीस धरले आहे. गेल्या दोन तीन दिवसांच्या काळात या भटक्या कुत्र्यांनी (dogs ) दोघांना चावे (dog bites)  घेतले असून त्यांच्यावर महाड (Mahad) ग्रामीण रुग्णालयात (Govt Hospital) उपचार सुरु आहेत. कुत्र्यांच्या या दहशतीमुळे हजारो महाडकर नागरिक भीतीच्या (frightening) छायेखाली वावरताना दिसतात. महाड नगर पालिकेने पुन्हा एकदा या कुत्र्यांविरोधात मोहिम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

महाड शहरात भटक्या कुत्र्यांचा बेफाम वावर ही गेल्या अनेक वर्षांपासूनची समस्या आहे. शहरातील मुख्य रस्ते आणि गल्ली बोळात या कुत्र्यांचा वावर दिसून येतो. इमारतींच्या पार्किंगमध्ये, त्याच प्रमाणे रात्रीच्या वेळेस बंद दुकानांच्या आश्रय हे कुत्रे घेत असतात. त्या ठिकाणी कुत्र्यांच्या घाणीने रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. हजारोंच्या संख्येने असलेले हे भटके कुत्रे दिवसा वाहतुकीला अडथळा तर आणित आहेतच, रात्रीच्या वेळेस एकट्या दुकट्या दुचाकी स्वाराच्या मागे लागून त्याची त्रेधातिरपीटही उडवत आहेत. अशाच घटनांमध्ये दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन काही लोक जखमी देखील झाले आहेत. अनेक कुत्री जखमी किंवा लूत भरलेली असून त्यामुळे शहरातील नागरीकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झालेला दिसून येतो.

पिसाळलेल्या कुत्र्यांनी माणसांना चावे घेण्याचे प्रकारही सातत्याने घडत असतात. काही दिवसांपूर्वी शहरातील वीरेश्वर मंदिर परिसरात एका लहान मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. सुदैवाने तेथे असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत या मुलाची कुत्र्यांच्या झुंडी पासून सुटका केली. तर काल परांजपे शाळे समोर साहिल संदीप पानवकर या मुलाला बाईक वरून जाताना कुत्र्याने हल्ला करत पायाला चावा घेतला. सध्या त्याच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर अन्य एका घटनेत कुत्र्यांनी चावा घेतल्याने कल्पेश जाधव हा जखमी झाला असून त्याच्यावरही महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुत्र्यांनी चावे घेण्याचे प्रकार शहरात सातत्याने घडत असतात.

काही वर्षांपूर्वी शहरातील या भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी त्यांना पकडून त्यांची नसबंदी करण्याची मोहिम महाड नगर पालिकेने राबविली होती. प्रचंड पैसा खर्च करूनही ही मोहिम यशस्वी न झाल्याने नगर पालिकेने ही मोहिम थांबविली. त्यामुळे त्या नंतरच्या काळात शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या दुप्पट तिप्पट वाढली आहे. या पेक्षा कडक उपाय योजना करायची झाल्यास प्राणी संरक्षक कायदे आड येत असल्याने सध्यातरी कुत्र्यांचा हा उपद्रव रोखण्यात महाड नगर पालिका हतबल ठरत असल्याचेच दिसून येते. त्यांचा कायम स्वरूपी बंदोबस्त करणे शक्य होत नसल्याने शहरातील नागरिकांनाही या कुत्र्यांच्या दहशतीखाली वावरण्याखेरीज दुसरा पर्याय राहिलेला नाही.

मोकाट गुरे आणि भटकी कुत्री ही महाड शहराची एक गंभीर समस्या आहे. यात गेल्या काही दिवसांपासून भटकी गाढवे आणि घोड्यांची (खेचरे ) भर पडली आहे. स्वच्छता मोहिमेत महाड नगर पालिका जीव तोडून काम करित असताना ही भटकी जनावरे या मोहिमेत अडथळे निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे नगर पालिकेने काही ठोस उपाय योजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

काही वर्षांपूर्वी महाड शहरात डुकरांनीही असेच थैमान घातले होते. तत्कालीन नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक सुनील कविस्कर यांनी टीका आणि विरोधाला न जुमानता सर्व डुकरे पकडून त्यांना जंगलातील दऱ्यांमध्ये सोडून दिले होते. त्यामुळे आज शहरात एकही डुक्कर पहावयास मिळत नाही.

शहरातील मोकाट गुरांना, गाढव, घोड्यांना मालक आहेत. त्यांना वारंवार ही जनावरे बांधून ठेवण्याच्या सूचना देवूनही हे मालक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. महाड नगर पालिकेकडे कोंडवाड्याची जागा आहे पण तेथे ते अनेक वर्षांपासून कार्यरत नाही. ते कार्यरत करून शहरातील भटकी जनावरे पकडून त्यांना या कोंडवाड्यात ठेवून नंतर लिलावात विकून टाकणे हा पर्याय आहे. महाड शहर मोकाट गुरांपासून मुक्त करण्यासाठी या पर्यायाची तात्काळ अंमल बजावणी करावी अशी मागणी आता पुढे येवू लागली आहे. नसबंदीचा प्रयोग अयशस्वी झाल्यानंतर आणि या कुत्र्यांना जीवे मारणे कायद्याने शक्य नसल्याने डुकरां प्रमाणेच त्यांना पकडून जंगलात निर्मनुष्य भागात त्यांना सोडून देण्याचा पर्याय महाड नगर पालिकेने स्विकारणे गरजेचे झाले आहे.

शहरात कुत्र्यांची वाढती संख्या आणि त्यांचा उपद्रव हा चिंताजनक आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेकाना या कुत्र्यांनी चावे घेतले आहेत. कुत्र्यांची वाढती संख्या,त्यांची घाण आणि त्यांच्या पासून नागरिकाना होणारा उपद्रव पाहता नगर पालिका प्रशासनाने त्यावर कायम स्वरूपी उपाय योजने गरजेचे आहे. त्यांना पकडून जंगलात सोडून देणे हाच एक प्रभावी उपाय असून त्याचाच अवलंब नगर पालिकेने करावा.

- प्रितम सकपाळ, महाडकर नागरिक