
सुतारवाडी -रोहा - कोलाड राज्यमार्गावरील तसेच धाटाव औद्योगिक अंतर्गत रस्त्यावरिल काही पथदिवे बंद पडलेले दिसत आहेत. ऐन पावसाळ्यात या राज्यमार्गावर टप्प्या टप्प्यावर पथदिवे बंद असल्याने
सुतारवाडी – रोहा – कोलाड राज्यमार्गावरील तसेच धाटाव औद्योगिक अंतर्गत रस्त्यावरिल काही पथदिवे बंद पडलेले दिसत आहेत. ऐन पावसाळ्यात या राज्यमार्गावर टप्प्या टप्प्यावर पथदिवे बंद असल्याने अंधार दिसत आहे. तसेच काही ठिकाणी पथदिवेच खांबांसह गायब आहेत. तर काही खांबावर दिवेच नाहीत. त्यामुळे या राज्यमार्गावरील बंद पडलेले पथदिवे त्वरीत चालू करण्याची मागणी कामगारवर्गातुन होत आहे. या मार्गावरुन रात्रीच्या वेळी दररोज येणा-या जाणा-या धाटाव औद्योगिक परिसरात रोजीरोटीवरील कामगारवर्गाला याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरील काही पथदिवे बंद पडलेले आहेत. तर जे पथदिवे चालु आहेत. तेही झाडांच्या फांद्यांमधून लपाझपीचा खेळ खेळत आहेत. त्यामुळे या मार्गावर रात्रीच्या वेळी अंधारच अंधार पडलेले दिसत असते.
सध्या भर पावसाळा सुरु आहे. त्यामुळे पावसाने ढग भरुन आले कि रात्रीच्या वेळी खूपच काळोख पसरतो. इतका अंधार असतो. कि रस्त्यावरून जाणा-या वाहन चालविणा-या चालकांना वाहनाचे दिवे लावूनही रस्त्यावरून मार्गक्रमण करतांना मोठी कसरत करावी लागत आहे. महत्वाचे म्हणजे या राज्यमार्गावरुन रात्रीच्या वेळीसुद्धा मोठी रहदारी सुरु असते. या मार्गावर किर्र काळोख पडल्याने रस्त्याने मार्गक्रमण करताना येथे अपघाती परिस्थिती निर्माण झाली आहे. याच मार्गावरुन धाटाव औद्योगिक परिसरात ड्युटीवर सेकंड शिफ्टला व नाईट शिफ्टला जाणारे कामगार मोठ्या प्रमाणात असल्याने अंधारामुळे अपघात होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
यामधे रोहा – कोलाड राज्यमार्गावरील रस्तेसुद्धा खड्डेमय झालेले आहेत. त्यातच रस्त्यांच्या साईड पट्ट्याही खचलेल्या आहेत.तसेच झाडांची दाटीसुद्धा खुप असल्याने या राज्य मार्गावर जास्त अंधार होतो. रात्रीच्या वेळी पहाताना या मार्गावरील काही पथदिवे बंद पडलेले दिसत आहेत. तर या राज्यमार्गावरील काही पथदिवे एक बंद आणि एक चालू अशी परिस्थिती पहातांना दिसत आहे. तरी बंद असलेले पथदिवे त्वरीत सुरु करण्यात यावेत. तसेच या मार्गावरील काही पथदिवे चालू आहेत. परंतु निसर्ग चक्रीवादळामुळे दिव्यांची दिशा बदलून काही पथदिवे झाडांच्या फांद्यांआड लपल्यामुळे अशा पथ दिव्यांचा प्रकाश झाडांमध्येच लपला जात आहे. असे पथदिवे झाडांच्या फांद्यांतून मोकळे करण्यांत यावेत. अशी मागणी येथील कामगारवर्गातून होत आहे.