पनवेल महापालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांना मिळणार पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ

पनवेल (panvel) : देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील फेरीवाल्यांसाठी (street vendors) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी १ जून २०२० रोजी केंद्र सरकारच्या (central government) माध्यमातून पंतप्रधान स्वनिधी योजना (Prime Minister’s Swanidhi Yojana) जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ पनवेल महानगरपालिका (panvel municipal corporation) क्षेत्रातील फेरीवाल्यांना होण्याकरिता सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन आढावा बैठक पार पडली.

या बैठकीस महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त समीर जाधव, वंदना गुळवे, नगरसेवक बबन मुकादम, निलेश बाविस्कर, नगरसेविका दर्शना भोईर, ॲड. चेतन जाधव, जनकल्याण योजनेचे महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष रोहित कोळी, उपाध्यक्ष आभा जोशी, सरचिटणीस अनिकेत लाखे उपस्थित होते. देशातील प्रत्येक नागरिक आत्मनिर्भर झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना आखल्या आहेत. त्यामध्ये फेरीवाल्यांचा व्यवसाय वृद्धिंगत होण्याकरिता पंतप्रधान स्वनिधी योजना अंमलात आणली. या योजनेतून प्रत्येक फेरीवाल्यास १० हजार रुपये कर्ज दिले जाणार आहे. या योजनांचा पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त फेरीवाल्यास लाभ झाला पाहिजे यासाठी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत चर्चा झाली. या योजनेचा प्रचार व प्रसार, सर्वेक्षण, आधारकार्ड लिंक, प्रमाणपत्र, बँक अधिकाऱ्यांशी संवाद आदी बाबींवर त्याचबरोबर फेरीवाल्यांकडून अवैधरित्या वसुली केली जात असेल तर त्या संदर्भात कार्यवाही करण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.

कोरोना व त्यामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊन परिस्थितीमुळे फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झाले नाही. परंतु आता लवकरच सर्वेक्षण हाती घेतले जाणार आहे. सर्वेक्षण झाल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र दिले जाणार असून आधारकार्ड, रेशनकार्ड व इतर संबंधित कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर फेरीवाल्यांना पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ मिळणार आहे. त्या संदर्भात या बैठकीत चर्चा झाली लवकरच यासंदर्भात पुढील बैठक होणार आहे.