सुतारवाडी धरण पाण्याने भरले तुडुंब

  • सतत तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असले तरी बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. या परिसरातील लावणीची काम बळीराजाने उरकली असून गणपती सणासाठी सज्ज झाला आहे. सतत तीन दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसाने नागरिकांना घराबाहेर पडू दिले नाही.

सुतारवाडी : गेले तीन दिवस सातत्याने मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे सुतारवाडी येथील धरण पाण्याने तुडुंब भरले आहे. त्याचप्रमाणे आजूबाजूला असलेले लहान मोठे नाले तसेच नद्या सुद्धा पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. आंबिवली येथील धरण सुद्धा पाण्याने मोठ्या प्रमाणावर भरलेले दिसत आहे. नागपंचमीला पावसाने दांडी मारली होती मात्र नागपंचमी नंतर हवामान खात्याने वर्तविल्या प्रमाणे गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार  पडणाऱ्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. आंबा नदीसुद्धा पाण्याने भरली असून त्यातून वाहणारे पाणी मोठ्या प्रमाणावर ओसंडून वाहत आहे.

सतत तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असले तरी बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. या परिसरातील लावणीची काम बळीराजाने उरकली असून गणपती सणासाठी सज्ज झाला आहे. सतत तीन दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसाने नागरिकांना घराबाहेर पडू दिले नाही. गणपती सण १६ दिवसांवर आला असून मखर तसेच गणपती सणासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये तुरळक माणसे दिसत आहेत. रस्ता रुंदीकरणामुळे कोलाड येथील बाजार अस्त व्यस्त झाल्याने गणपती सजावटीचे साहित्य फारसे आलेले दिसत नाही कोरोना मुळे एस.टी च्या गाड्या सुरू झालेल्या नाहीत. दमदार पणे पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर असलेले खड्डे वाहन चालकाला दिसत नसल्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणावर महामार्गावरच्या रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागत आहे.