
सुतारवाडी:निसर्ग चक्रीवादळामुळे ३ जून रोजी रायगडमध्ये खूप नुकसान झाले. जागोजागी असलेले विद्युत पोल जमीनदोस्त झाले. संपूर्ण रायगड जिल्ह्याचा विद्युत पुरवठा खंडित झाला. सुतारवाडीच्या
सुतारवाडी: निसर्ग चक्रीवादळामुळे ३ जून रोजी रायगडमध्ये खूप नुकसान झाले. जागोजागी असलेले विद्युत पोल जमीनदोस्त झाले. संपूर्ण रायगड जिल्ह्याचा विद्युत पुरवठा खंडित झाला. सुतारवाडीच्या आसपासच्या प्रत्येक ग्रामीण भागात जागोजागी, रस्तोरस्ती विद्युत पोल, तारांसह कोसळले होते. त्यामुळे काही गावांना आठ दिवसांमध्ये विद्युत पुरवठा पूर्ववत झाला तर सुतारवाडी गावचा पंधरा दिवसांनी विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला. येथील विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी येथील तरुणांसह, ग्रामस्थ तसेच विद्युत कर्मचारी कृष्णा वारगुडे, प्रेमसिंग जाधव, नरेश सानप, चंद्रकांत सानप, सुजित सानप, गणेश पडवळ, विठ्ठल बेर्डे, संकेत देवूरकर, आशिष सुतार आदींनी मोठी मेहनत घेऊन जागोजागी जमीनदोस्त झालेले विद्युत पोल उभारले. त्यावर विद्युत वाहिनी जोडून डी.पी. वरील विद्युत सुरळीत करून तब्बल पंधरा दिवसांनी सुताररवाडी येथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.
सुतारवाडी प्रमाणे सावरवाडी, धगडवाडी, दुरटोली, जामगाव, पाथरशेत, जाधववाडी, जावटे, कुडली, आंबिवली, नारायणगाव, पहूर, वांगनेवाडी, कोलाड, मुठवली, पुगाव, चिंचवली गावातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी तेथील तरुणांसह ग्रामस्थ आणि विद्युत कर्मचाऱ्यांनी अत्यंत मोलाचे कार्य केले. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अनेकांना अंधारात जीवन जगावे लागले. घरावरील छप्पर उडालं, रहायचे कुठे हा प्रश्न अनेकांना भेडसावत होता. रिमझिम पाऊस पडत होता त्यामुळे अनेकांना कठीण परिस्थितीत रहावे लागले. पंचनामे होऊन दिवस उलटून गेले अद्याप मदतीचा हात पुढे आला नाही त्यामुळे अनेकांच्या घरावरचे पत्रे उडालेल्या अवस्थेमध्ये तसेच आहेत. विद्युत पुरवठा बंद होता तेव्हा अनेकांना डासांशी सामना करावा लागला होता. तसेच विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवर जावून पाणी आणावे लागले. अनेक दैनंदिन कामे लाईटशिवाय ठप्प झालेली होती. ग्रामस्थ, तरुण तसेच विद्युत कर्मचार्यांनी तातडीने दक्षता घेऊन विद्युत पुरवठा पूर्ववत केल्यामुळे हायसे वाटले. अनेक संकटापासून सुटका झाल्यामुळे विद्युत मंडळाला धन्यवाद दिले.