स्वदेशी वस्तूंचा प्रचार व प्रसार करण्यासाठी युवक सज्ज

पनवेल : भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन भाजपाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून ‘आत्मनिर्भर युवा - आत्मनिर्भर

पनवेल : भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन भाजपाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून ‘आत्मनिर्भर युवा – आत्मनिर्भर भारत’ या स्वदेशी वस्तूंचा वापर रोजच्या जीवनात वाढविण्यासाठीचा उपक्रम भारतीय जनता युवा मोर्चाने हाती घेतला असून चीनी बनावटीच्या वस्तूंवरील बहिष्कार करताना जिल्हाभरातील युवकांमध्ये भारतीय बनावटीच्या वस्तू वापरण्यासाठीचा सकारात्मक प्रचार व प्रसार करण्याचा निर्धार युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आला आहे. 

गुगल मीट अॅपद्वारे ऑनलाईन पद्धतीने युवा मोर्चाच्यावतीने संकल्प करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून सहभागी झालेले भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विक्रांत पाटील यांनी युवकांना मार्गदर्शन केले.  २०२२ साली येत्या ७५व्या स्वातंत्र्यदिनापर्यंत रोजच्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंपैकी किमान ७५% भारतीय बनावटीच्या (मेड इन इंडिया) वस्तूंचा वापरण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. जागतिक योग दिनाचे औचित्य साधून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत शेकडो युवकांनी ऑनलाईन प्रतिज्ञा घेतली.  भारताबाहेर बनणाऱ्या उत्पादनातून परदेशातील लोकांना रोजगार मिळवण्याची व पैसा कमावण्याची संधी देण्यापेक्षा अशा वस्तुंचे भारतात बनणारे उत्तम दर्जाचे व किफायतशीर पर्याय कोणते याची माहिती देणारे व जनजागृती करणारे “आत्मनिर्भर युवा, आत्मनिर्भर भारत” या नावचे फेसबुक पेज व ग्रुप युवा मोर्चाने तयार केलेले आहे. या फेसबुक पेजवर कोणीही चौकशी केल्यास आपल्याला लागणाऱ्या वस्तूंचा भारतात तयार होणारा विकल्प देखील सुचवला जाईल, अशी व्यवस्था भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे, अशी माहिती युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी दिली. त्याचबरोबर मॉल, व इतर दुकानांनी चीन बनावटीच्या वस्तू विकण्यासाठी घेऊ नये, यासाठी त्यांना भेटून जनजागृती करत स्वदेशी वस्तूंचा प्रचार व प्रसार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.