army tank

पाकिस्तानला १९७१ च्या लढ्यात नामोहरम करणारा भारतीय सैन्यदलातील टी-५५ रणगाडा(t-55 tank) अलिबागच्या समुद्रकिनारी(alibag beach) विराजमान झाला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

अलिबाग : पाकिस्तानला १९७१ च्या लढ्यात नामोहरम करणारा भारतीय सैन्यदलातील टी-५५ रणगाडा(t-55 tank) अलिबागच्या समुद्रकिनारी(alibag beach) विराजमान झाला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

विधान परिषद सदस्य जयंत पाटील यांच्या हस्ते आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या विशेष उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्यावेळी माजी आमदार पंडितशेट पाटील, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगराध्यक्ष वकील मानसी म्हात्रे, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, अलिबाग नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश चौधरी, टी-५५ रणगाडा चालविणारे उमेश वाणी, शेकाप महिला आघाडीच्या प्रमुख चित्रलेखा पाटील, भावनाताई पाटील, नगरपरिषदेतील विविध विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक, पर्यटकांसह स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टी-५५ हा रणगाडा भारतीय सैन्यात असताना हा रणगाडा चालविणारे उमेश वाणी यांनी यावेळी रणगाड्याचा इतिहास सांगताना हा रणगाडा १९६८ मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाल्यानंतर २०११ पर्यंत या रणगाड्याने सेवा दिली असे सांगितले.

ते पुढे म्हणाले, सांबा सेक्टर आणि पंजाब हद्दीतही शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी या रणगाड्याने भारतीय सैन्याला मदत केली. त्यानंतर या रणगाड्याचे उत्पादन बंद झाले. हा रणगाडा दोन कि.मी. अंतरावर गोळा फेकू शकतो. या रणगाड्यात चारजण बसण्याबरोबरच तो ३६० डिग्रीमध्ये फिरतो . तसेच पाच मीटर खोल पाण्यातूनही शत्रूवर प्रहार करणारा हा रणगाडा असून, संसदेवर अतिरेकी हल्ला झाल्यानंतर भारतीय सीमेचे रक्षणही या रणगाड्याने केल्याचे वाणी म्हणाले. तसेच १९७१ च्या युद्धात अलिबागचे जनरल्रअरुणकुमार वैद्य युद्धाचे नेतृत्व केल्याने त्यांना कोणीच विसरू शकणार नसल्याचेही वाणी यावेळी म्हणाले.

रायगडचे जिल्हाधिकारी असताना ज्यांनी रणगाडा अलिबागेत आणण्यासाठी प्रयत्न केले तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणात आजचा दिवस माझ्यासाठी आनंदाचा दिवस असून, सरकारी माणूस बदली होऊन गेला की, लोक विसरतात. मात्र रायगडकर मला विसरले नाहीत यातून त्यांचे प्रेम दिसून येते असे म्हणाले.

रायगडचा जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना रणगाडा अलिबागेत आणण्यासाठी त्यावेळी कोणते प्रयत्न केले याबाबत सांगतांनाच रायगड हा छत्रपती शिवाजीमहाराजांच्या मावळ्यांचा जिल्हा आहे, असे असले, तरी रायगडमधून भारतीय सैन्यात जाणाऱ्या युवकांची-युवतींची संख्या कमी असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आपल्या भाषणात अलिबागच्या समुद्रकिनारी विराजमान झालेला हा रणगाडा अलिबागला पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना नक्कीच आकर्षित करेल असे सांगतांना जिल्ह्यातील युवक-युवतींना भारतीय सैन्यात जाण्यासाठीही नक्कीच प्रेरणा देईल असे सांगत भारतीय सैनिकांचे त्यांनी आपल्या भाषणात कौतूक केले. विधान परिषद सदस्य जयंत पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अलिबाग समुद्रकिनारी विराजमान झालेला रणगाडा हा अलिबागच नव्हेतर रायगडची शान वाढविणार असल्याचे सांगितले.

पर्यटकांना उपयुक्त असा विकास अलिबाग नगरपालिकेने केल्याचे सांगताना येत्या काही काळात शहर  हद्दीतील नाल्य़ांचाही प्रश्न सोडविला जाणार असल्याचे सांगतानाच आदर्श अलिबाग नगरपरिषद करण्यामध्ये आपलाही वाट असल्याचे पाटील यांनी सांगितले. अलिबागेतील सरखेल कान्होजीराजेआंग्रे यांच्या समाधीस्थळ परिसरात लाईटबरोबरच साऊंडचाही समावेश करण्यासाठी आपण प्रय़त्नशील असल्याचे पाटील यांनी सांगितले.

अलिबाग नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी त्यांच्या कार्यकाळात उत्तम काम महेश चौधरी यांनीकेले. मात्र त्यांची अन्यत्र बदली झाल्याने त्यांचा यावेळी शेकाप आमदार जयंत पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्य़क्रमाचे सूत्रसंचालन कराताना प्रदीप नाईक यांनी गेल्या २० वर्षात अलिबागचा चेहरामोहरा बदलला असल्याचे सांगत नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ अलिबाग- सुंदर अलिबागबरोबरच सुरक्षित अलिबाग असल्याचे सांगितले. तसेच अलिबागला रणगाडा आणण्यात तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचा सिंहाचा वाटा असल्याचे नाईक म्हणाले.

टी-५५ पराक्रम इतिहास

टी-५५ या रणगाड्याने १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचे ५८ रणगाडे उद्ध्वस्त केले होते. १९६० ते १९८० या तीन दशकांच्या काळात सीमाहद्दीवर या रणगाड्याने पाकिस्तानी सैन्यदलात मोठी दहशत निर्माण केली होती. भारतीय सैन्यदलात या रणगाड्याने तब्बल ४० वर्षे सेवा दिली आहे.