ताकई रस्त्यावरून राजकीय पक्षांचे नेते,कारखानदार आक्रमक होताच पालिकेकडून खड्डे भरण्यास सुरूवात

खालापूर : ताकई रस्त्याची दुरवस्था झाल्याने आणि खड्ड्यातून प्रवास करावा लागत असल्याने संतापलेल्या नागरिकांनी पालिकेत धडक दिली. नगराध्यक्षा सुमन औसरमल यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्थानिक नागरिक,

खालापूर : ताकई रस्त्याची दुरवस्था झाल्याने आणि खड्ड्यातून प्रवास करावा लागत असल्याने संतापलेल्या नागरिकांनी पालिकेत धडक दिली. नगराध्यक्षा सुमन औसरमल यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्थानिक नागरिक, कारखानदार आणि राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेताच आज खड्डे भरण्यास सुरूवात करताच स्थानिक रहिवाश्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

खोपोली नगरपालिकेच्या हद्दीतील ताकई रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. गेली अनेक वर्षे या रस्त्याचे काम करण्यात आले नसल्याने दर पावसाळ्यात रस्त्यावर मोठे खड्डे पडतात. या रस्त्यासाठी ४ कोटी ८० लाख रूपयांचा निधी मिळाला असून कोरोनामुळे निधी रखडल्याने यंदाही खड्ड्यातून प्रवास करावा लागणार असल्याने स्थानिकांमध्ये संताप आहे. या संतापाचा उद्रेक सोमवारी झाला. नगराध्यक्षा सुमन औसरमल यांच्या दालनात झालेल्या बैठकीला आरपीआय पक्षाचे रायगड युवक जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, शेकापक्षाचे जिल्हासह चिटणीस किशोर पाटील,तालुका चिटणीस संदीप पाटील,अॅड.रामदास पाटील,होनाड ग्रा.पं.सदस्य प्रकाश पाटील,शेकापचे नेते निकेश देशमुख, समीर देशमुख,राष्ट्रवादीचे सुनिल सुखदरे,आरकोश इंड्रस्ट्रीजमधील कंपनीचे मालक विक्रांत पाटील,अनिल खालापूरकर,अशपाक लोगडे यांच्यासह ताकई ग्रामस्थ,कारखानदार, राजकीय पक्षांचे प्रमुख उपस्थित होते. त्यांनी आक्रमक भूमिका घेत नगराध्यक्षा सुमन औसरमल,मुख्याधिकारी गणेश शेटे,नगरसेवक मोहन औसरमल,सुनील पाटील यांना चांगलेच धारेवर धरत ताकई रस्त्यावरील आपघातात जीवितहानी झाल्यास पालिकेचे लोकप्रतिनिधी व प्रशासनावर गुन्हा दाखल करू, असा इशारा आरपीआयचे जिल्हा युवक अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी दिला आहे. तर स्थानिक नागरिक, कारखानदार आणि राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेताच पालिकेने खड्डे भरण्यास सुरूवात करताच स्थानिक रहिवाश्यांनी समाधान व्यक्त केले आहे.