तळा पोलीस ठाण्याला हक्काची इमारत व पोलीस वसाहतीची प्रतीक्षा

तळा : तळा तालुक्याची निर्मिती होऊन आज जवळजवळ २० वर्षे झाली तरीही तळा पोलीस ठाण्याला अजूनही स्वतःची हक्काची अशी इमारत व येथील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी पोलीस वसाहत नाही. गेली २० वर्षे तळा पोलीस

तळा : तळा तालुक्याची निर्मिती होऊन आज जवळजवळ २० वर्षे झाली तरीही तळा पोलीस ठाण्याला अजूनही स्वतःची हक्काची अशी इमारत व येथील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी पोलीस वसाहत नाही. गेली २० वर्षे तळा पोलीस ठाण्याचा कार्यभार भाड्याच्या जागेत चालत असल्याने पोलीस ठाण्याला हक्काची इमारत कधी मिळेल, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.

तालुक्याची निर्मिती झाली त्यावेळी दहा पोलीस व एक पोलीस निरीक्षक असा ताफा होता. हाच ताफा पुढे कमी कमी होत गेला तो एक दोन वर येऊन ठेपला. पुढे आऊट पोलीस स्टेशन होऊन माणगाव पोलीस ठाणे अंतर्गत गेला. तालुक्याची निर्मिती झाल्याने विविध कार्यालये उभी होत गेली. लोकसंख्या वाढत गेली. वसाहती तळा शहरात उभ्या राहिल्या. तालुक्याचे ठिकाण असल्याने तालुक्याला स्वतंत्र पोलीस ठाण्याची गरज भासू लागली. त्यामुळे तळावासीयांकडून पोलीस ठाण्याची मागणी होऊ लागली. या मागणीचा विचार होऊन तळा येथे स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर होऊन २००९ मध्ये उद्घाटन मोठ्या उत्साहात झाले. हे पोलीस ठाणे कोषागार कार्यालयाच्या खोलीमध्ये सुरू झाले. काही वर्षे गेल्यावर कोषागार कार्यालय कर्मचारी वर्ग मंजूर झाला.आणि पुन्हा पोलीस ठाण्याच्या या जागेवर गदा येऊन पोलीस ठाणे येथून हलविण्यात आले. भाड्याने हे पोलीस ठाणे तळ्याच्या ग्रामदेवता चंडिका माता मंदिराशेजारील भाड्याच्या खोल्यांमध्ये सुरू करण्यात आले. त्यावेळी ना घर का ना घाट का अशी अवस्था पोलीस ठाण्याच्या इमारतीबाबत पाहायला मिळाली. चंडिका माता मंदिराशेजारील भाड्याच्या जागेत त्यावेळी सुरू करण्यात आलेले पोलीस ठाणे आजतागायत त्याच जागेत भाड्याने आहे.पोलीस वसाहत व इतर सुविधा नसल्याने त्याचा पोलीस कर्मचाऱ्यांना सुध्दा त्रास होत आहे.त्यामुळे शासनाने तळा शहराजवळील जागेत सुसज्ज व सर्वसोयीयुक्त असे पोलीस ठाणे व पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी वसाहत मंजूर करून बांधावे, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.