अखेर ‘त्या’ म्हसळ्यातील शिक्षकावर निलंबनाची कारवाई

म्हसळा : कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण देशासह महाराष्ट्र अडचणीत सापडला आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व खबरदारी म्हणून गावागावात

म्हसळा : कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण देशासह महाराष्ट्र अडचणीत सापडला आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व खबरदारी म्हणून गावागावात कोरोना संसर्ग नियंत्रण पथक स्थापन करण्यात आले आहेत. या पथकाद्वारे कोरोनाबाबत माहिती देण्यासाठी ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशासेविका असे सरकारी व निमसरकारी कर्मचारी महत्वाची भूमिका बजावत आहेत. असे असताना म्हसळा तालुक्यातील एका शिक्षकाने लॉकडाऊन व संचारबंदीचे उल्लंघन करून बेकायदेशीर काम केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. 

म्हसळा तालुक्यातील पाष्टी केंद्रांतर्गत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भापट या शाळेतील उपशिक्षक  अजय केंद्रे या शिक्षकाने २२ एप्रिल रोजी म्हसळा ते कर्जत असा मारुती सुझुकी गाडीने प्रवास करून बेकायदेशीररित्या व धोकादायक पध्दतीने आंब्याच्या पेट्या घेऊन जाण्याचे काम केले होते.  बेकायदेशीररित्या आंब्याच्या पेट्या घेऊन म्हसळा ते कर्जत असा प्रवास केल्याचे आढळून आल्याने कर्जत पोलिसांनी अंदाजे दोन लाखांचा माल व एक मारुती सुझुकी व्हॅन जप्त करून संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल केला होता. म्हसळा तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे यांनी गटशिक्षणाधिकारी संतोष शेडगे यांच्यामार्फत घडलेल्या घटनेची सविस्तर चौकशी करुन मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांना अहवाल सादर केला होता. 

शिक्षक अजय केंद्रे यांनी मा.जिल्हाधिकारी रायगड यांनी कोविड १९ (कोरोना) संदर्भात वेळोवेळी दिलेले संचार बंदीचे आदेश माहीत असून देखील अवज्ञा करून बेकायदेशीररित्या व धोकादायक पद्धतीने प्रवास केल्याचे आढळून आले म्हणून त्यांचे विरुद्ध भा.दं.वि.सं. कलम २६९, १८८ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियम ३ चा भंग केलेला आहे. म्हणून महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील तरतुदीनुसार ३० एप्रिलपासून जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात येत आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी निलंबन आदेश पत्रात नमूद केले आहे. 

संबंधित शिक्षक अजय केंद्रे यांनी केलेल्या कृतीबाबत सविस्तर चौकशी अहवाल गटविकास अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांना पाठविला होता. त्यानुसार सर्व चौकशी करून रायगड जिल्हा परिषद अलिबाग, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ३० एप्रिल रोजी  शिक्षक अजय केंद्रे याला निलंबित केले आहे, असे म्हसळा शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी संतोष शेडगे यांनी माहिती देताना सांगितले आहे.