teacher

पनवेल : पनवेल महापालिकेच्या(panvel municiple corporation) शाळेतील शिक्षक (teachers), शिक्षकेतर कर्मचार्‍यांना पगार(salary) आणि निवृत्त शिक्षकांना वेळेवर पेन्शन(pension) मिळणार असून सातवा वेतन आयोग ही लागू होणार असल्याचे समजते. सत्ताधारी पक्ष त्याबाबत सकारात्मक भूमिका घेणार असल्याने शिक्षक आणि निवृत्त शिक्षकांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण होणार आहे.

पनवेल महापालिकेच्या ११ शाळातील ७४ शिक्षक, ३ शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या पगारासाठी आणि ९४ सेवानिवृत्त शिक्षकांच्या पेन्शनसाठी शासनाकडून अनेक वेळा महापालिकेला अनुदान वेळेवर येत नाही. त्यामुळे शिक्षकांची व विशेषत निवृतिधारकांची मोठी अडचण होते. कोरोना लॉकडाऊन काळात पेन्शन उशिरा मिळाल्याने अनेकांना औषधासाठी पैसे नसल्याने त्यांचे हाल झाले. या काळात शिक्षकांनी ही घरोघर फिरून सर्वेक्षणाची कामे केली पण त्यांना पगार वेळेवर मिळाले नाहीत .त्यामुळे त्यांना ही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले .
पनवेल महापालिकेने शिक्षक आणि निवृतिधारकांना भविष्यात अशा अडचणींना तोंड द्यावे लागू नये यासाठी शासनाचे अनुदान येण्यास वेळ झाल्यास महापालिकेच्या इतर कर्मचार्‍यांप्रमाणे त्यांनाही वेळेवर पगार व पेन्शन मिळावे यासाठी महापालिका फंडातून तरतूद करण्याचे ठरवले आहे. फंडातून पैसे घेऊन शासनाकडून अनुदान आल्यावर ते फंडात जमा करण्याचा प्रस्ताव स्थायी समिति समोर ठेवण्यात येणार आहे. याशिवाय शासनाने ऑगस्ट २०१९ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचा जीआर काढला आहे. त्याबाबतच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात येऊन त्याला मंजूरी देण्यासाठी स्थायी समितीत प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. त्याला मंजूरी मिळाल्यास शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू होईल .