काेराेनाच्या महामारीत मदत करायचे साेडून भाजप केवळ राजकारण करण्यात मग्न; नाना पटाेलेंची टीका

कोणता पक्ष विदूषक आणि कोणता पक्ष नायक याबाबतचा कौल पश्चिम बंगालच्या जनतेने दिला आहे. त्यामुळे अन्य राज्यांतील निवडणुकांमध्ये काँगेस पक्षच देशाचा हिरो असल्याचे प्रमाणपत्र जनताच देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    रायगड : काेराेनाच्या महामारीत मदत करायचे साेडून भाजप केवळ राजकारण करण्यात मग्न आहे. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेबाबत काॅंग्रेसने पूर्वसूचना दिली हाेती; मात्र माेदी सरकारने ते गांभीर्याने घेतले नाही. त्याचेच हे परिणाम असल्याचा आराेप काॅंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटाेले यांनी अलिबाग येथे केला.

    दरम्यान रायगड जिल्ह्याला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी आज नाना पटोले दौऱ्यावर आले होते.यावेळी अलिबाग तालुक्यातील नवगाव, वरसोली, खानाव, वावे या नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा त्यांनी केला. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

    यावेळी माजी खासदार हुसेन दलवाई, प्रदेश चिटणीस राजन भोसले, सुदर्शन पांडे, आबा दळवी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिक जगताप, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. श्रद्धा ठाकूर, ॲड. जे. टी. पाटील, ॲड. प्रवीण ठाकूर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. प्रथमेश ठाकूर, ॲड. कौस्तुभ पुनकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

    कोणता पक्ष विदूषक आणि कोणता पक्ष नायक याबाबतचा कौल पश्चिम बंगालच्या जनतेने दिला आहे. त्यामुळे अन्य राज्यांतील निवडणुकांमध्ये काँगेस पक्षच देशाचा हिरो असल्याचे प्रमाणपत्र जनताच देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तौक्ते चक्रीवादळाने नुकसान केले आहे. शेतकरी, बागायतदार, मच्छीमार आणि घरांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने योग्य पंचनामे करावेत. अशा सूचना पटोले यांनी दिल्या.