फीसाठी ऑनलाईन शिक्षण बंद करण्याची धमकी; संतप्त पालक शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडूंना भेटणार

खारघर येथील ग्रीनफिंगर्स ग्लोबल स्कूल कोरोनामुळे आर्थिक अडचणीत असतानाही जादा फी वसूल करण्यासाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद करण्याची धमकी देत असल्याचा आरोप करत संतप्त पालकांनी रविवारी शाळेसमोर जोरदार आंदोलन केले.

पनवेल : खारघर येथील ग्रीनफिंगर्स ग्लोबल स्कूल कोरोनामुळे आर्थिक अडचणीत असतानाही जादा फी वसूल करण्यासाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद करण्याची धमकी देत असल्याचा आरोप करत संतप्त पालकांनी रविवारी शाळेसमोर जोरदार आंदोलन केले.

शाळेने वार्षिक शिक्षण शुल्क आणि इतर वाढीव शुल्क कमी केले नाही, तर आम्ही आंदोलन आणखी तीव्र करू, असा इशारा पालकांनी या वेळी दिला. या प्रश्नावर सोमवारी पनवेल महापालिका शिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांची भेट घेऊन संबंधित शाळेवर कारवाई करण्याची मागणी केली जाणार असल्याचे पालकांनी सांगितले.

शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी देखील पालकांनी संपर्क साधला. बच्चू कडू यांची मंगळवारी मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन पालकांना फीसाठी धमकावणाऱ्या ग्रीनफिंगर्स ग्लोबल स्कूलवर तडकाफडकी कारवाई करण्याची मागणी केली जाणार असल्याची माहितीही या वेळी पालकांनी दिली.