कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पर्यटकांनी फिरवली पर्यटनाकडे पाठ ; समुद्रकिनारे, हॉटेल्स पडली ओस

कंटाळलेले हौशी पर्यटक कामात बदल म्हणजे विश्रांती, या सूत्रानुसार चार दिवस आरामात निसर्गाच्या सान्निध्यात व्यतीत करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील अलिबाग, किहीम, काशिद बीच, मुरुड जंजिरा, दिवेआगर, हरि हरेश्वर या ठिकाणी पर्यटक गर्दी करीत असत. मागील दोन आठवड्यांपासून पर्यटकांचा ओघ कमी झाल्यामुळे सर्वच व्यावसायिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. १ मार्च पूर्वीच कोरोना वाढण्याच्या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई येथे रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आल्याने शासनाने पुन्हा लॉकडाऊन आणला तर विनाकारण अडकून पडू, या अनामिक भीतीमुळे लोकांनी घराबाहेर न पडण्याची भूमिका घेतल्याचे चित्र आहे.

    मुरुड: राज्यात नव्याने वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्ण संख्येचा फटका पर्यटन व्यवसायाला बसला आहे. मुंबईपासून अवघ्या १६० किमी अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्या अनेक पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. रायगड जिल्ह्याला लाभला ३२० किलोमीटरचा सागरी किनारा कायम पर्यटकांना भुरळ घालतो. मुंबई पासून रायगडचे अंतर अगदी कमी असल्याने शनिवार- रविवार येथे पर्यटकांची गर्दी असते. मात्र मागील काही दिवसापासून मुबंईत सातत्याने कोरोना रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी पर्यटनाकडे पाठ फिरवली आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील दिवेगार, हरिहरेश्वर, बागमांडला, मुरुड येथील जंजिरा किल्ला, काशीद समुद्र किनारा, अलिबाग येथील कुलाबा किल्ला, किहीम बीच, ऐतिहासिक स्थळे अशी अनेक ठिकाणे ओस पडू लागली आहेत.

    शनिवार व रविवार या दोन दिवसात साधारण एक लाखापेक्षा जास्त लोक येऊन जात असतात. दोन दिवसात पर्यटक स्थानिकांना मोठा रोजगार उपलब्ध करून देतात. हजारो हॉटेल व्यावसायिक व लॉजिंग सर्वत्र हाऊसफुल्ल असतात; परंतु मागील दोन आठवड्यांपासून पर्यटकांची संख्या कमालीची रोडवल्याने हॉटेल व लॉजिंग व्यवसायाची चिंता वाढली आहे. सर्व लॉजच्या रूम फुल्ल असावयाच्या; परंतु आता फक्त किमान दोन रूमच जात आहेत. तेच चित्र हॉटेलवाल्यांचेसुद्धा दिसून येत आहे. भोजनाचे सर्व बेंच फुल असायचे. असंख्य पर्यटक वेटिंगवर असावयाचे; परंतु आता येथेसुद्धा खूप कमी पर्यटक येत असून, बेंच उपलब्ध आहेत; परंतु पर्यटक नाहीत.

    कंटाळलेले हौशी पर्यटक कामात बदल म्हणजे विश्रांती, या सूत्रानुसार चार दिवस आरामात निसर्गाच्या सान्निध्यात व्यतीत करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील अलिबाग, किहीम, काशिद बीच, मुरुड जंजिरा, दिवेआगर, हरि हरेश्वर या ठिकाणी पर्यटक गर्दी करीत असत. मागील दोन आठवड्यांपासून पर्यटकांचा ओघ कमी झाल्यामुळे सर्वच व्यावसायिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. १ मार्च पूर्वीच कोरोना वाढण्याच्या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई येथे रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आल्याने शासनाने पुन्हा लॉकडाऊन आणला तर विनाकारण अडकून पडू, या अनामिक भीतीमुळे लोकांनी घराबाहेर न पडण्याची भूमिका घेतल्याचे चित्र आहे.

    टीव्हीवर कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून पर्यटक बाहेर पडणे टाळत आहेत. आमच्याकडे आगाऊ बुकिंग होती; परंतु त्या अचानक रद्द करण्यात आलेल्या आहेत. मागील दोन आठवड्यात २५ टक्केसुद्धा व्यवसाय झालेला नाही. -मनोहर बैले, लॉज मालक

    मुरुड शहरात पर्यटकांची गर्दी फेब्रुवारी अखेर मोठ्या संख्येने होती. स्वाभाविक स्थानिक व्यावसायिकांची कमाई चांगली होती. समुद्र किनाऱ्यावरील पाव-वडा सेंटर, शहाळे पाणी, स्नॅक्स, पाणीपुरी, भेलपुरी, उपहारगृहे विशेषतः शुक्रवार, शनिवार आणि रविवार फुलून गेल्याने पर्यटन व्यवसाय तेजीत होता.

    पर्यटकांनी पर्यटनस्थळाला भेट न दिल्याने पर्यटन व्यवसायाला अचानक ब्रेक लागल्याची स्थिती पहावयास मिळते आहे. समुद्र किनारी असणारे वॉटर स्पोर्ट, घोडागाडी, उंट सफर, बोटींग व्यवसाय थंड पडले आहेत.

    जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांची संख्या ७० टक्के घटली
    ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर गेल्या आठवड्यापासून पर्यटकांची संख्या ७० टक्के घटली असून, राजपुरी बंदरातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या शिडाच्या होड्यांना पर्यटकांची प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रवासी बोटचालक संघटनेचे पदाधिकारी जावेद कारबारी यांना विचारले असता, ते म्हणाले की, प्रत्येक शुक्रवारी पर्यटकांच्या बोटीतून जाण्यासाठी उड्या पडतात; मात्र या शुक्रवार, शनिवार व रविवारी १४ शिडाच्या होडीला पर्यटकां अभावी रिकामे परतावे लागले. इतकी पर्यटकांची संख्या रोडावल्याचे त्यांनी सांगितले.