प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

पाळीव जनावरांची चोरी केल्यानंतर  त्यांची कत्तल करुन त्यांच्या मासांची तस्करी करणाऱ्यांना चार आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले असून, सर्व आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

अलिबाग :  रायगड जिल्ह्यातील (Raigad District) पेण, वडखळ, पाली, रोहा, खोपोली, कर्जत, रसायनी आदी ठिकाणी पाळीव जनावरांची चोरी केल्यानंतर  त्यांची कत्तल करुन त्यांच्या मासांची तस्करी करणाऱ्यांना चार आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले असून, सर्व आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्हयामुळे जनमाणसांत भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे या गुन्हयांचा लवकरात लवकर उलगडा करुन त्यांतील आरोपींचा शोध घेण्याबाबतच्या सुचना जिल्हा पोलिस अधिक्षक अशोक दुधे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण  शाखेचे पोलिस निरिक्षक जे.ए.शेख यांना दिल्या होत्या.

या सुचनेप्रमाणे शेख यांनी शाखेचे नेमणुकीतील सहायक पोलिस निरिक्षक श्रीकृष्ण नावले, संदीप पोमण, पोलिस उपनिरिक्षक महेश कदम आणि स्टाफ अशा खास पथकाची नेमणूक केली गेली होती. त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांच्या गोपनिय बातमीदाराकडून खात्रीशिर माहिती संकलित करुन आसीफ सादिक कुरेशी (जुबली पार्क, कौसा-मुंब्रा,जि.ठाणे),  साकिब सहिद मनीयार (लेफर कॉलनी, पत्री पुल, कल्याण (प.), जि.ठाणे),

सुरज खलीराम कायरीया (कोनगांव, कोनगांव, ता.कल्याण), इंतजार अली मुद्दी शेख (धुम कॉम्प्लेक्स, चांदनगर, कौसा मुंब्रा जि.ठाणे) या आरोपिताने केल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे  पथकातील पोलीस अधिकारी-अंमलदार यांनी या सर्व आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतल्यानंतर या आरोपींकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता, सर्व आरोपींनी रायगड जिल्ह्यात पेण, वडखळ, पाली, रोहा, खोपोली, कर्जत, रसायनी आदी ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली. तसेच या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली वाहनेही हस्तगत करण्यात  तपास पथकाला यश आले आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक सचीन गुंजाळ यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरिक्षक जे.ए.शेख, सहायक पोलिस निरिक्षक श्रीकृष्ण नावले, संदीप पोमण, पोलिस उपनिरिक्षक  महेश कदम आणि पथकाने केली आहे.

गुन्ह्यातील आरोपींची गुन्हे करण्याची कार्यपद्धती

अटक आरोपीत व पाहिजे असलेले त्यांचे साथीदार आरोपी सांयकाळी मुब्रां,भिवंडी, कल्याण येथून त्यांच्या वाहनाद्वारे निघून पनवेलमार्गे रायगड जिल्ह्यात प्रवेश करतात.  रात्रीच्या वेळी वाडी, वस्तीवर तसेच रस्त्यांवर फिरणाऱ्या गाय, बैल या जनावरांना गुंगीचे औषध ब्रेडला लावून खाण्यास देतात, तर कधी कधी गुंगीचे इंजेक्शन देतात. सुमारे 15 मिनिटात जनावर बेशुद्ध झाल्यानंतर त्याला बांधून वाहनात भरून किंवा निर्जन ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या जवळील हत्याराने जनावरांची कत्तल करून मुंडके, कातडे, कोथळा तेथेच टाकून मांस वाहनात भरून निघून जातात. त्यानंतर चोरी केलेले जनावर हे मार्केटमध्ये विकतात, तसेच मांसाची देखील मार्केटमध्ये विक्री करतात असे निष्पन्न झाले आहे.