श्रीवर्धन मधील खंडित वीज पुरवठयाची समस्या सुटता सुटेना

  • स्थानिक लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प
  • वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठया बाबत श्रीवर्धन शहरातील व श्रीवर्धन तालुक्यातील सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण लोकप्रतिनिधींच्या घरी इन्व्हर्टर किंवा जनरेटर असल्यामुळे त्यांना वीज पुरवठा केव्हा खंडित होतो हेच कळत नाही. सहा ते सात वर्षापूर्वी श्रीवर्धन शहरातील वाणी आळी, बाजार पेठ, टिळक रोड या परिसरात अंडरग्राउंड वीज वाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. मात्र त्या सुरू करण्याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई महावितरणकडून करण्यात आलेली नाही.

श्रीवर्धन – श्रीवर्धन तालुक्यातील वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या अतिशय जटिल होत चाललेली आहे. निसर्ग चक्रीवादळाने श्रीवर्धन तालुक्यातील बहुतांश विजेचे पोल पडल्यामुळे तसेच वीज वाहक तारा तुटून गेल्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांना अनेक दिवस अंधारात राहावे लागले आहे. सर्वप्रथम श्रीवर्धन शहरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. हा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी देखील महावितरणला २८ दिवसांचा कालावधी लागला. जवळजवळ पन्नास दिवसानंतर हरिहरेश्वर, मारळ, बागमांडले या परिसरात वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. बोर्लिपंचतन, कुडगाव, दीघी या ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सुद्धा दीड महिन्याचा कालावधी लागलेला आहे. चार दिवसापूर्वी श्रीवर्धन दांडे परिसरात जाणारी भूमिगत वीजवाहिनी देखील खराब झाल्यामुळे त्या परिसरात तीन दिवस अंधार होता. काल रात्री साडेअकरा वाजता खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दुपारचे बारा वाजले. 

पाभरे ते श्रीवर्धन या इन्कमिंग लाईन वरती बिघाड झाल्यामुळे सदर वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात आले. काल सुद्धा श्रीवर्धन तालुका त्यामुळे बारा तास अंधारात होता. मुख्य मार्गावरील वीजपुरवठा सुरू झाला असला तरी अद्याप श्रीवर्धन तालुक्यातील लहान मोठ्या वाड्या व छोटी गावे तसेच दुर्गम भागातील वाड्या अद्यापही अंधारा मध्येच आहेत. पाभरे ते श्रीवर्धन सब स्टेशन ही विद्युत वाहिनी भूमिगत करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. श्रीवर्धन येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता महेंद्र वाकपैंजण यांनी चक्रीवादळा नंतर खरोखर काम चांगले केले. परंतु त्यांना देखील कोरोनाने सोडले नाही. ते देखील कोरोनावरती इस्पितळात उपचार घेत आहेत. 

वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठया बाबत श्रीवर्धन शहरातील व श्रीवर्धन तालुक्यातील सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण लोकप्रतिनिधींच्या घरी इन्व्हर्टर किंवा जनरेटर असल्यामुळे त्यांना वीज पुरवठा केव्हा खंडित होतो हेच कळत नाही. सहा ते सात वर्षापूर्वी श्रीवर्धन शहरातील वाणी आळी, बाजार पेठ, टिळक रोड या परिसरात अंडरग्राउंड वीज वाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. मात्र त्या सुरू करण्याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई महावितरणकडून करण्यात आलेली नाही.

पावसाची एखादी जोरदार सर कोसळली तरी  इन्कमिंग लाईन लगेच ब्रेक होते. लाईन ब्रेक झाल्यानंतर महावितरणचे कर्मचारी बॅटऱ्या व त्यांची सर्व साधने घेऊन बिघाड शोधण्यासाठी जंगलातून फिरत असतात. या सर्व समस्यांसाठी एकमेव मार्ग म्हणजे पाभरे सब स्टेशन ते श्रीवर्धन सब स्टेशन अंडरग्राउंड वीज वाहिन्या  टाकणे. दुपारी बारा वाजता वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर साधारण दीड वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा वीज पुरवठा वारंवार खंडित होत होता. तरी श्रीवर्धनच्या आमदार व रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. अशी मागणी श्रीवर्धन तालुक्यातील जनतेकडून केले जात आहे.