धाटाव दशक्रोशीसह वरसे परिसरातील पाणी ओसरू लागले

  • धाटाव गावासह यशवंत ग्रामपंचायत धाटाव कार्यालयात तसेच मोरे वसाहतीमधील ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरले होते. तसेच नुकतीच भात लावणी झालेली, या परिसरातील भात शेती पूर्णपणे पूराच्या पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होणार आहे. गेली तीन ते चार दिवस पावसाने रौद्ररुप धारण केल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले होते.

सुतारवाडी : धाटावसह रोहा तालुक्यात गेली तीन ते चार  दिवस पावसाने रौद्ररुप धारण केले होते. तुफानी पाऊस पडत होता त्यामुळे धाटाव दशक्रोशीसह वरसे भागात सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे येथील सर्वभाग जलमय झाला होता. अनेकांच्या घरांचे,  धाटाव स्टॉप येथील छोटेखानी बाजारपेठेतील दुकाने,  हॉटेलमध्ये पाणी आल्याने व्यापारी वर्गांचे पावसाच्या पूरामुळे नुकसान झालेले होते. कोरोना भितीचे वातावरण असतांनाच जून मध्ये निसर्ग चक्रीवादळ झाले. त्यावेळीही सर्व नागरिकांचे मोठे नुकसान झालेले असतानाच आता मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली होती. यामधेही अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार अशी भिती व्यक्त करण्यांत येत आहे. 

धाटाव गावासह यशवंत ग्रामपंचायत धाटाव कार्यालयात तसेच मोरे वसाहतीमधील ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरले होते. तसेच नुकतीच भात लावणी झालेली, या परिसरातील भात शेती पूर्णपणे पूराच्या पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होणार आहे. गेली तीन ते चार दिवस पावसाने रौद्ररुप धारण केल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. तुफानी पडलेल्या पावसामुळे रोठ खुर्दची उपनदी गंगा व कुंडलिका नदीने रौद्ररुप धारण करित धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले आहे. गेले तीन दिवसापासून पावसाने धाटाव दशक्रोशीत तुफानी बरसून हांहाकार माजवला आहे.  या अतिवृष्टीमुळे वरसे, रोठ खुर्द, उडदवणे, धाटाव दशक्रोशीसह सर्वच ठिकाणी महापूर येऊन या भागातील जनजीवन विस्कळीत झालेले पहातांना दिसत आहे. धाटाव औद्योगिक परिसरात रोजीरोटीवर येणा-या कामगारांना कामावर जाता आले नसल्याने कामगारवर्गाचेही नुकसान झालेले आहे. 

 सतत मुसळधार पडत असलेला तुफानी पाऊस, त्यामधे समुद्र भरतीचे पाणी, त्यातच डोंगरमाथ्यावरुन धोधो वाहत आलेले नाल्यांमधुन येणारे पाणी यामुळे धाटाव येथील जनजीवन विस्कळीत झालेले होते. तसेच रोहा परिसरातील जीवनवाहिनी कुंडलीका नदीच्या पाण्याची पातळी वाढून महापूर परिस्थिती निर्माण झालेली होती.  

तर रोठ खुर्दची उपनदी गंगेलाही पूर आला असून या परिसरातील संपूर्ण भाग पाण्याखाली गेलेला होता. यामध्ये धरणाचे पाणीही सोडले तर मोठी संकट परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर चार दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे धाटाव स्टॉप जवळील दुकानातून तसेच धाटाव, वरसे, रोठ खूर्द येथील काही ग्रामस्थांच्या घरांत पूराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झालेले आहे. तसेच वरसे येथील स्मशानभूमि संपूर्ण पाण्याखाली गेलेली दिसत होती. तर या भागातील सर्वात उंच उडदवणे येथील पुलाला लागून पाणी वाहत असल्याने या भागातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले होते. असाच पाऊस अजून पडत राहीला तर या भागातील काही गावांचा संपर्क तुटण्याची भिती व्यक्त करण्यात येत होती.

या तीन दिवसात रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडल्याने  धाटाव, विष्णूनगर, किल्ला, वाशी, महादेववाडी, मळखंडवाडी, लांढर,  उडदवणे, तळाघर, बोरघर, रोठ बुद्रुक, रोठ खूर्द, वरसे, निवी या भागातील खलाटी पाण्याखाली गेलेली दिसत आहे.

पावसाच्या हाहांकारामुळे अवघे जनजीवन विस्कळीत झालेले दिसत असताना दि. ७ ऑगस्ट ला पावसाने विश्रांती घेतल्याने जागोजागी साचलेले पाणी आता ओसरू लागल्याने अनेकांची भिती दुर होत आहे.