रोहा तालुक्यातील काही भागात धूळ वाफेवरची पेरणी वेळेवर

सुतारवाडी - रोहा तालुक्यातील धूळ वाफेवरील पेरणी केलेली भाताची रोपे बहरली आहेत. पावसाने ३० तारखेला सुरवात केल्या पासुन रिमझीम रिमझीम पडत आहे. त्यामध्ये सातत्य असणे आवश्यक आहे. रोहा तालुक्याच्या

 सुतारवाडी – रोहा तालुक्यातील धूळ वाफेवरील पेरणी केलेली भाताची रोपे बहरली आहेत. पावसाने ३० तारखेला सुरवात केल्या पासुन रिमझीम रिमझीम पडत आहे. त्यामध्ये सातत्य असणे आवश्यक आहे. रोहा तालुक्याच्या सर्वच भागात मागील वर्षी धूळ वाफेवर भात पेरण्या झाल्या नव्हत्या. यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यातच भात पेरणी योग्य पावसाने हजेरी लावल्याने येथील बळीराजा सुखावला आहे. वळवाचा पाऊस वेळेवर झाल्यामुळे काही भागात भाताच्या पेरण्या वेळेत केलेल्या आहेत. तर काही भागात अजूनही पेरणीची कामे सुरु आहेत. यावर्षी सुरुवातीला काही भागात धूळ वाफेवर केलेली भात पेरणीची रोपे आता बहरलेली पहातांना दिसत आहेत. परंतु निसर्ग चक्रीवादळ दि. ३ जून रोजी झाल्याने या नैसर्गिक आपत्तीत अनेकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. 

यामधे बळीराजाही मोठ्या संकटात सापडलेला आहे. एकीकडे घर-गोठा दुरुस्तीची कामे करत नैसर्गिक आपत्तीला तोंड देत आहेत. आता काही भागात भातशेती उखळणीची कामे सुरु केलेली आहेत. गायी गुरे कमी झाल्याने उखळणीच्या कामाला नांगर मिळत नाहीत. त्यामुळे ट्रॅक्टर घेऊन सध्या उखळणीची कामे येथील काही भागांत सुरु झालेली आहेत. परंतु काही भागांत अजूनही पेरणीची कामे सुरु आहेत.        

दरवर्षी मे महिन्यात वळवाचा पाऊस झाल्यावर धूळ वाफेवर भाताच्या पेरण्या केल्या जातात. दरवर्षी एक दोन वेळातरी मे महिन्यात वळवाचा पाऊस पडायचा. मात्र यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वळवाचा पाऊस झाल्याने येथील शेतक-यांनी भातपेरणी वेळेत सुरु केल्याने हि भाताची रोपे आता बहरलेली दिसत आहेत. मात्र जूनच्या दुस-या आठवड्यात पावसाने दडी मारल्याने बळीराजा पून्हा चिंतेत आला होता. या दोन दिवसांत पुन्हा थोडी हजेरी लावल्याने समाधान वाटत आहे. परंतु अजूनही अपेक्षित पाऊस सुरू झालेला नाही. आणि सध्या पावसाचे वातावरणही पाहिजे तसे दिसत नाही. त्यामुळे धाटाव दशक्रोशीसह रोहा तालुक्यातील सर्वच भागातील भाताच्या पेरण्या १० ते १५ दिवस पुढे लांबलेल्या आहेत असे येथील शेतकरी  सांगत आहेत. पूर्व भागात दमदार पाऊस होऊन जमिनीला वापसा आल्यावरच पेरणी करतात. त्यामुळे अद्याप शेतकरी शेतीच्या मशागतीची कामे करण्यातच व्यस्त आहेत. 

धाटाव दशक्रोशीसह रोहा तालुक्यातील ब-याच भागातील शेतकऱ्यांनी शेतीच्या खाचरांच्या चालींची प्राथमिक स्वरुपाची कामे बांध बंधिस्ती करून शेत जमिनीची नांगरणी, उखळण केलेली आहे. शेतकरी वळवाच्या नाही तर आता मान्सून पावसाची वाट पाहत आहेत. तालुक्याच्या काही भागात दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात वळवाचे दोन-तीनवेळा तरी दमदार पाऊस झाल्यावर रोहिणी नक्षत्रावर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धूळ वाफेवर भाताची पेरणी केली जाते. एप्रिल-मे महिन्यात वळवाच्या पाऊसाने फक्त हजेरी लावली. परंतु जून महिना सुरू झाला तरीही अद्याप पाऊसाचा जोर दिसत नाही. तालुक्याच्या काही भागातील शेतकरी धूळ वाफेवर पेरत असलेल्या भाताच्या पेरण्या निसर्ग चक्रीवादळमुळे अजूनही रखडल्या आहेत. पर्यायाने भात लावणी उशिराने व काढणीलाही उशीर होईल. असे शेतकरी सांगत आहेत. 

रोहा तालुक्याचा एकूण भौगोलिक क्षेत्र पहाता ७० हजार ५०० हेक्टर  इतके असून तालुक्यात साधारणत: १७८ गावे येतात. पिका खालील निव्वळ पेरणी १४ हजार २३४ हेक्टर एवढी येते. त्यामधे ऊन्हाळी हंगामातील पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १ हजार ८०० हेक्टर आहे. तर खरिप हंगामातील पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १४ हजार १४१ हेक्टर आहे. रोहा तालुकाभरात भात हे प्रमुख पीक असून सर्वाधिक सुमारे १४ हजार १४१ हेक्‍टरवर भाताची लागवड केली जाते. यावर्षी भातशेतीची सर्वच कामे निसर्ग चक्रीवादळमुळे व पावसामुळे उशिराने होणार आहेत. त्यामुळे बळीराजा चिंता व्यक्त करतांना दिसत आहे.