औद्योगिक परिसरातील अंतर्गत रस्त्यावर झाडे पडल्याने अपघाती परिस्थिती

सुतारवाडी: अचानक झालेल्या निसर्ग चक्रीवादळी पावसामुळे रोह्यासह धाटाव परिसरातील सगळ्यांचेच अतोनात नुकसान झालेले आहे. अनेकजण बेघर होऊनघरांची कौले उडाली तर अनेक बिल्डिंग व औद्योगिक परिसरातील

सुतारवाडी: अचानक झालेल्या निसर्ग चक्रीवादळी पावसामुळे रोह्यासह धाटाव परिसरातील सगळ्यांचेच अतोनात नुकसान झालेले आहे. अनेकजण बेघर होऊन घरांची कौले उडाली तर अनेक बिल्डिंग व औद्योगिक परिसरातील कारखान्यांच्या प्लॅन्टचे पत्रे उडाले. तसेच अनेक भागांतील झाडे पडून वस्तीवाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. धाटाव औद्योगिक परिसरासह रोहा कोलाड राज्यमार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून रस्त्यावर पडली होती. त्यामुळे परिसरातील रहदारी काही दिवस बंद होती. रहदारी सुरु होण्यासाठी प्रशासनाने तातडीने रस्त्यावर उन्मळून पडलेली झाडे, विज खांब बाजूला करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी वायरमन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीला स्थानिक ग्रामस्थांनीसुद्धा मदत करुन औद्योगिक परिसरातील अंतर्गत रस्त्यांसह रोहा कोलाड राज्यमार्ग रहदारीसाठी मोकळे केले. मात्र यावेळी मोठ्या रस्त्यावर उन्मळून पडलेल्या झाडांच्या फांद्या छाटून रस्ते मोकळे केले होते. परंतु या मोठ्या झाडांची भलीमोठी खोडे अर्धवट कापलेली रस्त्यावर दिसून येत आहेत. त्यामुळे या अर्धवट कापलेल्या झाडांमुळे अपघाती परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी अर्धवट कापलेली झाडे संबंधितांनी दखल घेत रस्ते पूर्णपणे मोकळे करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.

पूर्वीच्या ओखी वादळासारखा फटका निसर्ग चक्रीवादळाने दिल्याने रायगडमधील अनेक भागांना याचा फटका बसला. रोहा तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या धाटाव औद्योगिक परिसरातील अंतर्गत रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे पडलेली होती. ती झाडे तात्पुरता रस्ता मोकळा होण्यासाठी अर्धवट तोडल्याने त्या झाडांचे काही भाग रस्त्यावर दिसून येत असल्याने येथे अपघाती परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे. तरी अशी अर्धवट कापलेली झाडे त्वरीत पूर्णपणे काढण्यात यावीत. कारण औद्योगिक परिसरात दररोज तिन्ही पाळीत कामगार कर्मचारी कामावर येजा करतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच रोहा कोलाड राज्यमार्गावरसुद्धा ठिकठिकाणी अर्धवट कापलेल्या झाडांमुळे अपघाताची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तरी अशी अर्धवट कापलेली व रस्त्यावर  आलेली झाडे व फांद्या ताबडतोब काढण्यासाठी संबंधितांनी गांभिर्याने दखल घ्यावी.