श्रीवर्धन तालुक्यात २ डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह

श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असून आज श्रीवर्धन शहरातील १ व बोर्लीपंचतन येथील १ अशा दोन नामांकित डॉक्टर्सना कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाले आहे. ते याआधी पॉझिटीव्ह

श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असून आज श्रीवर्धन शहरातील १ व बोर्लीपंचतन येथील १ अशा दोन नामांकित डॉक्टर्सना कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाले आहे. ते याआधी पॉझिटीव्ह ठरलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात आले.

श्रीवर्धन तालुक्यामध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झाल्याने आपल्या घराची दुरुस्ती करण्यासाठी आलेल्या त्याचप्रमाणे कामानिमित्त कोरोना संसर्ग असणाऱ्या शहराच्या ठिकाणी गेलेल्या व नंतर श्रीवर्धनमध्ये वावरणाऱ्या काही मंडळींमुळे श्रीवर्धनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्याने श्रीवर्धनकर जनतेला कोरोना विसर पडला आहे. विना मास्क फिरणे, सामाजिक अंतराचे भान नसणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे हे प्रकार सर्वत्र दिसत आहेत. यामध्ये आता जनतेच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे.
 
आज आलेल्या अहवालानुसार श्रीवर्धन तालुक्यातील २ डॉक्टर्सना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी १ श्रीवर्धन तर १ बोर्लीपंचतन येथील आहे. आधीच्या पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने या दोघांना लागण झाल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, श्रीवर्धन तालुक्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या २४ झाली आहे. यापैकी १० रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत तर दुर्दैवाने ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ११ जणांवर उपचार सुरू आहेत. श्रीवर्धनमध्ये वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता शासकीय यंत्रणेने कडक निर्बंध आणणे गरजेचे आहे. सायंकाळी श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना समज देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे र.ना.राऊत शाळेच्या मागील बाजूस असलेल्या मैदानावर ५० युवक विना मास्क घालून फुटबॉल खेळत असतात त्यांच्यावर एकत्र न येण्यासाठी समज देणे आवश्यक आहे.