उमरोलीकरांची पावसाळ्यातील जीवघेण्या प्रवासातून होणार सुटका

पनवेल : पावसाळ्यात दरवर्षी उमरोली येथील नागरिकांना छोट्या पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागत होता. आमदार प्रशांत ठाकूर यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न कामी आल्याने आता नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले

पनवेल : पावसाळ्यात दरवर्षी उमरोली येथील नागरिकांना छोट्या पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागत होता. आमदार प्रशांत ठाकूर यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न कामी आल्याने आता नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे या वर्षीच्या पावसाळ्यात उमरोलीकरांची जीवघेण्या प्रवासातून सुटका होणार आहे.  

 पनवेल शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर उमरोली गाव वसलेले आहे. उमरोली येथे जाण्याच्या मार्गावरील पुलाची उंची कमी असल्याने अतिवृष्टी झाल्यास गाढी नदीला पूर येत असल्याने पुलावरून (फरशी) पाणी जाते. गावात जाण्याचा मार्ग दोन-तीन दिवस बंद राहतो.त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. शाळेत गेलेले विद्यार्थी परत येईपर्यंत पालक वर्ग चिंतेत असतो. त्यामुळे तेथील ग्रामस्थांनी अनेक वर्षांपासून नवीन पुलाची केली मागणी होती. आमदार प्रशांत ठाकूर यांनी ग्रामस्थांच्या या मागणीचा शासनाकडे पाठपुरावा करून उमरोली येथील पुलासाठी विशेष प्रयत्न केले. शासनाने उमरोली गावाच्या गाढी नदीवरील पुलासाठी १ कोटी ४५ लाख १४ हजार रुपये मंजूर केले. २०१९ मध्ये नवीन पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. सद्यस्थितीत पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून मार्गी लागलेल्या या प्रश्नामुळे येथील नागरिकांची पावसाळ्यातील जीवघेण्या प्रवासातून सुटका होणार आहे. त्याबद्दल येथील नागरिकांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले आहेत.