unemployment

महाड : गेल्या नऊ महिन्यांपासून संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना महामारीचे दृश्य परिणाम येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष पाहावयास मिळणार असून या महामारीने बेरोजगारीचे मोठे संकट उभे राहण्याची भीती उद्योग क्षेत्रातून व्यक्त केले जात आहे. कोरोनामुळे महाड(mahad) परिसरातील अनेक व्यवसाय अडचणीत आल्याचे बोलले जात असून बेरोजगार असलेल्या अनेकांनी घरगुती उद्योगाच्या माध्यमातून कुटुंबाच्या आर्थिक फायद्याकरिता रोजगार(employment) निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केल्याची माहिती चौकशी दरम्यान हाती आली आहे.

चालू वर्षीच्या मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या कोरोना महामारीचे संकट रुग्णांच्या संख्येत कमी होत असला तरीही महाड परिसरातील विविध व्यवसायांमधून असलेली रोजगारी यावर्षी मंदीच्या चक्रात अडकण्याची भीती या क्षेत्रातील मान्यवरांकडून व्यक्त केली जात असून याचे थेट परिणाम महाड परिसरात बेरोजगारी वाढली असे मानण्यात येत आहे.

कोरोना महामारीच्या काळात परराज्यातुन आलेल्या कामगार वर्गाला महाराष्ट्र शासनाने स्वखर्चाने त्यांच्या गावी पाठविले होते, यापैकी निम्म्या पेक्षा जास्त कामगार पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी रुजू झाल्याची माहिती औद्योगिक क्षेत्रात केलेल्या चौकशीदरम्यान प्राप्त झाली आहे. याचबरोबर कोकणवासीयांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असणार्‍या चाकरमानी मंडळांची मोठी संख्या आपल्या गावाकडे परतली आहे. या नागरिकांनादेखील औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक ठिकाणी रोजगार प्राप्त झाला आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या कंपन्यांकडून असलेले बाहेरील राज्यातील कंत्राटी कामगार व चाकरमानी कामगारांची संख्या वाढल्याने संबंधित कारखानदारांसमोर आता भरती कामी यक्षप्रश्न उभा राहणार असल्याची चर्चा कामगारवर्गातून ऐकू येऊ लागली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक धंद्यातून ऐंशी टक्के स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा कायदा करण्यात आला आहे. यानुसार गेल्या काही वर्षापासून स्थानिकांना कायमस्वरूपी कंत्राटी स्वरूपाची नोकरी महाड वसाहतींमध्ये प्राधान्याने प्राप्त झाली आहे. अनेक कंपन्यांतून काही वर्षे कंत्राटी काम केल्यावर संबंधित कामगारांच्या रेकॉर्डप्रमाणे ही त्यांना कंपनी सभेमध्ये कायम देखील करण्यात आले आहे.

यासंदर्भात काही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेदरम्यान शासनाच्या निर्देशानुसार स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला जात असून संबंधित कामाच्या ठिकाणी अत्यावश्यक असणाऱ्या रोजगाराकरिता कायमस्वरूपी कामगारदेखील स्थानिकांमधून प्राधान्याने निवडले जात असल्याचे निदर्शनास आणले आहे. सध्याचा कोरोना काय व त्यामुळे उद्योगांवर झालेले थेट परिणाम लक्षात घेऊन आगामी काळात अशा उद्योगांतून नवीन नोकर भरती प्रक्रिया करणे संबंधित व्यवस्थापनाला अडचणीचे ठरणार असल्याने स्थानिकांमधील बेरोजगारी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे .

महाडमधील स्थानिक बेरोजगार बाहेरील राज्यातून आलेले कंपनीचे पहिले कामावर असणारे कामगार वर्गामध्ये चाकरमानी मंडळींची पडलेली भर लक्षात घेता शासनाच्या कृषी क्षेत्रातील पर्यटन क्षेत्रातील विविध उद्योगांकडेही वळण्याचा मनोदय या बेरोजगार तरुणांमधून व्यक्त केला जात आहे.

शासनाकडून दिल्या जाणाऱ्या रोजगाराला असणाऱ्या मर्यादा लक्षात घेऊन ग्रामीण भागातील जनतेने आता आत्मनिर्भर होण्याचे मार्ग अंगिकारले असल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे. कोरोना भूतकाळात अनेक नवीन व्यावसायिक चाकरमाने मंडळींकडून सुरू करण्यात आल्याचेही या काळात अनुभवास आले आहे. या सर्व पार्श्वभुमीवर महाड तालुक्यातील बेरोजगारीचे संकट एकीकडे वाढल्याचे स्पष्ट संकेत मिळत असताना या समस्येवर मात करण्यासाठी स्थानिक कामगार व चाकरमान्यांनी स्वतःचे घरगुती स्वरूपाचे उद्योग सुरू करून यावर मात करण्याचे घेतलेले निर्णय भविष्यकाळाचा वेध घेताना फायदेशीर ठरतील असा विश्वास सामान्य नागरिकांसह या बेरोजगार घरांतील ज्येष्ठ बिल्डरांकडून व्यक्त केला जात आहे.

कोरोना महामारी काळामध्ये अनेक उद्योगधंदे बंद पडले, अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली या सर्व गोष्टींचा विचार करता महिलांना स्वावलंबी बनवून स्वतंत्र उद्योग सुरू करून त्यांना लागणारे सहकार्य आणि मार्गदर्शन आम्ही चार्मिंग लेडीज या संस्थेच्या माध्यमातून करणार आहोत. – विणा महामुणकर, संस्थापक चार्मिंग लेडीज